डॉ. सुजय विखे पाटलांना पवारांवरील टीकेबाबत असं वाटतंय...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

पवार आणि विखे पाटील कुटुंबात राजकीय मतभेद आहेत. गेल्या दोन पिढ्यांपासून ते चालत आले आहेत.

नगर ः राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. या टीकेमुळे राज्यभरात पडसाद उमटले. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पडळकर यांचा समाचार घेतला. परंतु भाजपमधील अनेक दिग्गजांनी त्यांना खडेबोल सुनावले. कालच पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीतील पवार यांचे निकटवर्तीय मधुकरराव पिचड यांनी आपण व्यथित असल्याचे जाहीर केले होते. आज खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची प्रतिक्रिया आली.

हेही वाचा - मुलगाच म्हणतो, आईचे अनैतिक संबंध

पवार आणि विखे पाटील कुटुंबात राजकीय मतभेद आहेत. गेल्या दोन पिढ्यांपासून ते चालत आले आहेत. मात्र, पवार यांच्यावर पडळकर यांनी ज्या भाषेत टीका केली ती धाकट्या विखे पाटलांना म्हणजेच डॉ. सुजय यांना रूचलेली नाही.

शरद पवार हे ज्येष्ठ नेते अाहेत. त्यांच्यावर खालच्या पातळीवर आरोप करणे चुकीचे आहे. हे माझे व्यक्तिगत मत असल्याचेही डॉ. विखे पाटील सांगायला विसरले नाहीत. 

केंद्र सरकारच्या निधीतून होणाऱ्या विकासकामांचा आराखडा तयार करताना, त्याची माहिती खासदारांना असणे गरजेचे आहे. या अगोदर झाले, ते आता होऊ देणार नाही. केंद्राच्या निधीतून होणाऱ्या कामांचे लोकार्पण इतर लोकप्रतिनिधींच्या हस्ते झाल्यास तक्रार करू, असा इशारा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला. 

केंद्राकडून येणाऱ्या निधीतून जिल्हा परिषदेमार्फत होणाऱ्या विकासकामांचा आढावा डॉ. विखे पाटील यांनी आज घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले,

""जिल्ह्यात पाणीयोजना नावलौकिकासाठी झाल्या. अनेक गावांत पाणीयोजना असतानाही तेथे टॅंकर सुरू करण्याची वेळ येते. त्यामुळे पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊनच पाणीयोजना राबविणार आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानासाठी केंद्राकडून आलेल्या 90 कोटींच्या निधीतून 36 कोटींचा निधी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामावर खर्च झाला.

क्लिक करा - क्या बात है..कोरोनावर होमिअोपॅथी असरदार

रुग्णालयाला विरोध नाही; पण तेथे डॉक्‍टरच नसल्याने निधी वाया जात आहे. काही प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या असता, अनेक केंद्र बंद दिसले. रुग्णालय बांधण्यापेक्षा तेथे अत्याधुनिक सामग्रीवर खर्च करण्याचा मानस आहे.'' 

कोरोनाच्या संकटात जिल्हा रुग्णालयावर अवलंबून राहावे लागते. वैद्यकीय स्टाफ चांगला असता, तर आज प्रत्येक तालुक्‍यात कोरोना सेंटर उभे राहिले असते. त्याचा फायदा झाला असता. कोरोनाच्या संकटात 95 टक्के सरपंचांचे काम चांगले आहे. त्यामुळे आमदार व खासदारांचे निम्मे काम सोपे झाल्याचे डॉ. विखे पाटील म्हणाले. 

राज्यात भाजप सरकार असते, तर आतापेक्षा परिस्थिती चांगली असती. मंत्री लॉक झाल्यामुळे जनता अनलॉक झाली, असे सांगून ते म्हणाले, ""माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासोबत नगर तालुक्‍याचा दौरा करणार आहे. भाजपशी एकनिष्ठ असणाऱ्यांनी आपल्याकडे यावे.'' 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dr. Sujay Vikhe Patil feels the same way about the criticism on Pawar