एटीएमची सुरक्षा रामभरोसे; सुरक्षारक्षक नेमण्याकडे बँकांचे दुर्लक्ष

आनंद गायकवाड 
Saturday, 28 November 2020

संगमनेर शहर व घुलेवाडीपर्यंतच्या परिसरात सुमारे 80 पेक्षा अधिक एटीएम सेंटर आहेत. मात्र त्यातील केवळ चार ते पाच अपवाद वगळता, सर्वच एटीएम सेंटरला कोणत्याही प्रकारची सुरक्षाव्यवस्था नाही.

संगमनेर (अहमदनगर) : संगमनेर शहर व परिसरातील राष्ट्रीयकृतसह इतर खासगी बँका व पतसंस्थांचे शहरातील काही मोजके अपवाद वगळता, जवळपास सर्वच एटीएम सेंटरला सुरक्षारक्षक नसल्याने त्यांची सुरक्षा रामभरोसे आहे.

हे ही वाचा : पाण्यावरील हक्कासाठी सात नंबर फॉर्म गरजेचा

संगमनेर शहर व घुलेवाडीपर्यंतच्या परिसरात सुमारे 80 पेक्षा अधिक एटीएम सेंटर आहेत. मात्र त्यातील केवळ चार ते पाच अपवाद वगळता, सर्वच एटीएम सेंटरला कोणत्याही प्रकारची सुरक्षाव्यवस्था नाही. केवळ सीसीटीव्ही कॅमेरे व शहर तालुक्यातील पोलिसांच्या रात्रगस्तीच्या भरोशावर लाखो रुपयांची मालमत्ता असलेली ही सेंटर आहेत. संगमनेर शहरातील नवीन नगर रोड ते कोल्हार घोटी राष्ट्रीय महामार्ग व शहरातून जाणाऱ्या नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या लगत विविध बँकांनी त्यांच्या ग्राहकांच्या सोईसाठी कधीही पैसे उपलब्ध असलेल्या, सुमारे 22 एटीएमची व्यवस्था केली आहे.

हे ही वाचा : विमा कंपनीची फसवणूक, वकिलासह दोघांवर गुन्हा

कॅशलेसच्य़ा जमान्यात आजकाल कुणीही मोठ्या रकमेचे चलन जवळ बाळगत नाहीत. जागोजागी उपलब्ध एटीएम व कार्ड स्वाईप करण्याची, ऑनलाईन पेमेंटची सुविधा सर्वत्र वापरली जाते. या पार्श्वभूमीवर हवे तेव्हा पैसे मिळण्यासाठी एटीएमच्या सेवेचा वापर होत असल्याचे दिसते. शहरातील पेट्रोलपंप, शैक्षणिक संस्था, रुग्णालये, आदींसह मोठ्या वर्दळीच्या सार्वजनिक रस्त्यावरील एटीएमच्या सुरक्षेची फारशी काळजी नसली तरी, शहरातील उपरस्ते व गल्लीबोळातही अनेक सेंटर आहेत. यांच्या सुरक्षिततेची खात्री देता येत नाही. निर्जन ठिकाणचे एटीएम लुटण्याच्या घटनाही घडल्या आहेत.

हे ही वाचा : राज्याचे सांस्कृतिक वैभव सरकारकडून दुर्लक्षित; साईचरित्र ग्रंथाला 90 वर्षे पूर्ण झाल्यामुळे शिर्डीत पूजन

शहर तसेच तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पोलिसांना रात्रगस्ती करताना प्रत्येक एटीएमला भेट देवून नोंद करणे बंधनकारक आहे. शहरी पोलिसांच्या तुलनेत ग्रामीण पोलिसांना 24 तासांची ड्युटी असल्याने, रात्रंदिवस विविध कामासह पुन्हा गस्तीचेही काम करावे लागत असल्याने, अनेक पोलिसांच्या ताणतणावात वाढ झाली आहे. याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावरही होताना दिसतो. यामुळे किमान बँकांनी त्यांच्या आर्थिक सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी केवळ पोलिसांवर हवाला ठेवण्यापेक्षा सुरक्षारक्षकाची नेमणूक करण्याची आवश्यकता आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Not all ATMs of other private banks and credit unions in Sangamner area including nationalized ones have security guards