घोड धरणाचे आर्वतन सोडण्याबाबत उजवे-डावे

संजय आ. काटे
Sunday, 10 January 2021

शिवाय या पाण्याचा निर्णय घेणारे कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष "कुकडी'चे कार्यकारी अभियंता आहेत. त्यामुळे हा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात दिरंगाई होत आहे.

श्रीगोंदे : कुकडी व घोड प्रकल्पात पुरेसे पाणी नसताना, लाभधारक शेतकऱ्यांच्या जिवाची होणारी उलघाल कायमचीच आहे. मात्र, सध्या घोडसह विसापूर प्रकल्पात शेतीची तीन आवर्तने होण्याएवढे पाणी आहे. मात्र, कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घोडचे पाणी लांबविल्याचा फटका बसतोय.

दुसरीकडे विसापूर प्रकल्पातून तालुक्‍यातील सात ते आठ गावांना फायदा होतो. हे पाणी "कुकडी'च्या अधिकाऱ्यांच्या हाती असतानाही ते सोडण्याबाबत उदासीनता असल्याने धरणे भरलेली, मात्र शेती तहानलेली अशी अवस्था आहे. 

हेही वाचा  - मोबाईल मॅपने केला घात, पुण्याचे तीन वाहून गेले

"कुकडी'च्या पाच पैकी दोन धरणांत पाणी कमी असल्याचे दाखविताना पुणे जिल्ह्यातील बंधाऱ्यांची नेत्यांना काळजी वाटली. त्यामुळे "कुकडी'च्या डाव्या कालव्याचे आवर्तन लांबविलेच, शिवाय बंधाऱ्यात अडीच टीएमसी पाणीही सोडण्यात पुणेकर यशस्वी झाले. त्यांच्या शेतकऱ्यांसाठी हा निर्णय योग्य असला, तरी श्रीगोंदेकरांवर होणाऱ्या अन्यायाकडे सर्वांचे दुर्लक्ष आहे. 

घोड धरणातील पाण्याचे नियोजन कर्जत, श्रीगोंदे व शिरूरचे आमदार करतात. त्यावर अंतिम निर्णय अर्थात जलसंपदा मंत्री घेत असले, तरी उजव्या कालव्याला पाण्याची गरज नाही, म्हणून डाव्याचे आवर्तन लांबविणे चुकीचे आहे. घोडच्या लाभक्षेत्रात पाण्याची गरज भासू लागली आहे. त्यातच ढगाळ वातावरणाने उपलब्ध पाणीही कमी होत आहे.

उभ्या पिकांना पाण्याची गरज वाढली आहे. अजून एक महिना पाणी सुटणार नसल्याने शेतकरी धरणात पाणी असूनही हवालदिल झाले आहेत. 

विसापूर मध्यम प्रकल्पात पाणी नसताना, त्याखालील पिंपळगावपिसे, घारगाव, बेलवंडी, लोणी व्यंकनाथ, चिंभळे, पिसोरे येथील शेती उद्धवस्त झाली आहे. यंदा मात्र हा प्रकल्प जवळपास पूर्ण भरलेला असून, महिन्याभरात "कुकडी'तून सुटणाऱ्या पाण्यात पुन्हा भरला जाणार आहे. त्यामुळे सध्या त्यातील 200 दशलक्ष घनफूट पाणी काढले, तर त्याखालील शेतीचे आवर्तन होईल.

शिवाय या पाण्याचा निर्णय घेणारे कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष "कुकडी'चे कार्यकारी अभियंता आहेत. त्यामुळे हा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात दिरंगाई होत आहे. 

गावकारभारी निवडणुकीत दंग 
"कुकडी'चे कर्मचारी व गावकारभारी सध्या ग्रामपंचायत निवडणुकीत गुंतले आहेत. मात्र, 15 जानेवारीनंतर का होईना, विसापूरचे आवर्तन सोडण्याबाबत निर्णय घेतला, तरी शेतकरी नियोजन करतील. कारण, सध्या पाणी कमी झाल्याने चिंभळे भागात विंधनविहिरी घेण्याचा धडाका सुरू आहे. 

पाणीवापर संस्थेच्या एकाही अध्यक्षाची विसापूरच्या पाण्याबाबत मागणीचा निरोप नाही. गरज असेल व मागणी आल्यास, तातडीने पाणी सोडण्याचा निर्णय करू. 
- स्वप्निल काळे, कार्यकारी अभियंता, कुकडी विभाग 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Officer's indifference to release of Ghod Dam