सुकलेली फुले अन् साध्या शालीने पद्मश्री राहीबाहींचा सत्कार; साई संस्थानमधील धक्कादायक प्रकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PadmaShri Rahibahi

सुकलेली फुले अन् साध्या शालीने पद्मश्री राहीबाहींचा सत्कार

शिर्डी (जि. अहमदनगर) : बिजमाता राहीबाई पोपेरे यांनी गेल्या शुक्रवारी पद्मश्री पुरस्कार सोबत घेतला आणि नतमस्तक होण्यासाठी त्या विमानाने थेट साईंच्या दरबारात दाखल झाल्या. मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बाणाईत यांनी त्यांचे साधी शाल व एक सुकलेले गुलाबपुष्प देऊन थंडे स्वागत केले. चहापान करण्याचे सौजन्य देखील दाखविले नाही. या अनपेक्षीत प्रकाराने त्यांच्या सोबत असलेल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर अक्षरशः आवाक होण्याची वेळ आली.

तुम्ही तर त्यांना साधे पाणी देखील दिले नाही. अशा शब्दात शिवसेनेचे पदाधिकारी सुनील परदेशी यांनी आपल्या मनातील खद्खद् आज समाज माध्यमातून व्यक्त केली.
ही पोस्ट आज शिर्डी परिसरात चर्चेचा विषय ठरली. खासदार सदाशिव लोखंडे यांनी याबाबत परदेशी यांच्याकडे विचारणा करून नेमका काय प्रकार घडला हे जाणून घेतले. याबाबत ‘सकाळ’शी बोलताना परदेशी म्हणाले, ‘‘साईमंदिरात मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आले की त्यांचा बऱ्याचदा भरजरी शाल देऊन साईमंदिरातच सत्कार केला जातो. त्यांच्यासाठी साईसंस्थान प्रसादालयात भोजन तयार केले जाते. सिलेब्रेटी सोबत फोटोसेशन करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी साईमंदिरात धाव घेतल्याचे चित्र अनेकदा पहायला मिळते. राहीबाई सिलेब्रेटी नाहीत किंवा मंत्रालयातून आलेल्या अधिकारी नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. केंद्र सरकारने त्यांचा पदमश्री पुरस्कार देऊन गौरव केला. याचे भान या अधिकारी मंडळींना राहिले नाही. त्यांचा साईमंदिरात भरजरी शाल देऊन सत्कार करायला हवा होता. त्या ऐवजी त्यांना भर दुपारी भुकेल्या पोटी दोन जिने चढून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये जावे लागले.

हेही वाचा: आमदारकीपेक्षा गरीबांच्या सेवेत आनंद : नीलेश लंके

तेथे गुलाबाचे सुकलेले फुल आणि साध्या शालीवर बोळवण करण्यात आली. या कार्यालयात अॅन्टीचेंबर आहे, तेथे त्यांना किमान नाश्ता व चहापान देता आले असते. मला व्यक्तीशः याचे फार वाईट वाटले म्हणून मी समाज माध्यमावर पोस्ट टाकून मनातील खदखद व्यक्त केली.’’
हा झालेला प्रकार राहीबाई यांच्या लक्षात आला नाही. कारण त्यांना येथील काहीही माहिती नव्हती. त्यांच्या सोबत असलेले स्थानिक पदाधिकारी मात्र अस्वस्थ झाले. भूकेने व्याकूळ झालेल्या राहीबाई व त्यांच्या सोबतच्या सहकारी कार्यकर्त्यांना दुपारी चारच्या सुमारास ग्रीन अॅण्ड क्लिन शिर्डीच्या पदाधिकाऱ्यांनी नाश्ता व चहापान दिले.

शाल खरेदीचाही प्रस्ताव पाठवलाय म्हणे

मंत्री, सिलेब्रिटी किंवा मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी साईदर्शनासाठी आले की त्यांचे भरजरी शाल देऊन स्वागत केले जाते. या शालीला शताब्दी शाल असे संबोधले जाते. त्या घाऊक प्रमाणावर खरेदी करण्याचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. राहीबाई यांच्या स्वागतासाठी बाजारपेठेतील कुणाही सामान्य व्यापाऱ्याने भरजरी शाल आणि गुलाबाचा हार दान दिला असता. असे दान मागण्याचा विचार देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मनात आला नाही.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यातील दरोडेखोरांची टोळी श्रीरामपूरात गजाआड

loading image
go to top