विद्यार्थ्यांना दिलासा! शाळा सुरु होणार असल्याने वसतिगृहांचेही निर्बंध हटले

अमित आवारी
Saturday, 21 November 2020

कोरोना संकटामुळे शाळा- महाविद्यालये सुरू करण्यास राज्य सरकारने निर्बंध घातले होते. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव आता काही अंशी कमी झाल्याने सरकारने सोमवारपासून (ता. 23) शाळा सुरू करण्यास मान्यता दिली.

अहमदनगर : कोरोना संकटामुळे शाळा- महाविद्यालये सुरू करण्यास राज्य सरकारने निर्बंध घातले होते. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव आता काही अंशी कमी झाल्याने सरकारने सोमवारपासून (ता. 23) शाळा सुरू करण्यास मान्यता दिली. त्यात 9 वी ते 12 वीपर्यंतचे वर्ग सुरू होणार आहेत. त्याचबरोबर वसतिगृहांवर असलेले निर्बंधही हटविण्यात आले आहेत. तसा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जारी केला आहे. 

राज्य सरकारने शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत; परंतु हा निर्णय शाळा व्यवस्थापन समितीने घ्यावा, असे म्हटले आहे. शाळा सुरू होणार असल्याने शिक्षकांच्या कोरोना चाचण्या सध्या केल्या जात आहेत. तसे निर्देशही सरकारने दिले आहेत. शाळा सुरू करताना शाळांची स्वच्छता, निर्जंतुकीकरण, कार्यगट स्थापन करणे, बैठकव्यवस्था करणे, पुरेसे अंतर राखणे, पालकांची संमती घेणे आदी सूचना या आदेशात देण्यात आल्या आहेत. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यावाठी येथे क्लिक करा
उपस्थितीच्या पारितोषिकांना लगाम 

शाळेत 100 टक्‍के विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, यासाठी शहरासह जिल्ह्यातील अनेक शाळा पारितोषिके देत असतात. कोरोना संकटात विद्यार्थ्यांना शाळेतील उपस्थिती बंधनकारक केलेली नाही. पालकांच्या संमतीवरच ती अवलंबून असणार आहे. पूर्ण उपस्थितीबाबतची पारितोषिके बंद करण्यात यावीत, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

स्वेच्छेने खासगी तपासण्या कराव्यात 
जिल्ह्यातील नववी ते 12वीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याच्या निर्देशाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यानुसार 16 हजार शिक्षकांच्या तपासण्या केल्या जाणार आहेत. मात्र, ही प्रक्रिया होण्यासाठी आठ ते दहा दिवस लागण्याची शक्‍यता असल्याने, शिक्षकांनी स्वेच्छेने आयसीएमआर मान्यताप्राप्त प्रयोगशाळेकडून स्वॅबची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केले आहे. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Permission from the District Collector for the hostel as the school will start on Monday