दरोड्याच्या तयारीतील पाचजणांची टोळी पोलिसांनी पकडली

आनंद गायकवाड
Saturday, 19 December 2020

रात्रगस्तीच्या वाहनातील सहकाऱ्यांसह त्यांनी गुरुवारच्या (ता. 17) मध्यरात्री दीडच्या सुमारास डोळासणे शिवारातील आरोपी लपलेल्या ठिकाणी धाव घेतली.

संगमनेर ः संगमनेर तालुक्‍यातील डोळासणे शिवारात दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला घारगाव पोलिसांच्या गस्ती पथकाने काल मध्यरात्री दीडच्या सुमारास पकडले. त्यातील दोन आरोपी अल्पवयीन आहेत. 

सतीश ऊर्फ चिक्‍या बाळू वाळे (वय 20), संतोष जालिंदर गुरकुले (वय 20), तसेच श्‍याम रामकृष्ण मोरे (वय 24) यांचा गुन्ह्यामध्ये समावेश आहे. 

या बाबत अधिक माहिती अशी ः संगमनेर तालुका हद्दीतून जाणाऱ्या नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील डोळासणे शिवारातील उड्डाणपुलाच्या खाली एका चारचाकी वाहनासह, गुन्हा करण्याच्या उद्देशाने दरोडेखोरांची टोळी लपली असल्याची माहिती घारगाव पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील पाटील यांना समजली.

हेही वाचा - कुकडी कालव्याला भगदाड, चाळीस वर्षांत दुरूस्तीच नाही

रात्रगस्तीच्या वाहनातील सहकाऱ्यांसह त्यांनी गुरुवारच्या (ता. 17) मध्यरात्री दीडच्या सुमारास डोळासणे शिवारातील आरोपी लपलेल्या ठिकाणी धाव घेतली. त्या ठिकाणी पिक-अप (एमएच 12 एमव्ही 7243) या वाहनात पाच जण आढळले. पोलिसांना पाहताच त्यांतील दोन जणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिस पथकाने पाठलाग करून त्यांना पकडले. आरोपींकडून चार लाख रुपयांचे दरोड्याचे साहित्य जप्त केले. 

वरील आरोपींसह 16 वर्षे वयोगटातील दोन विधिसंघर्षित बालकांना (सर्व रा. झोळे, ता. संगमनेर) यांना ताब्यात घेतले आहे. पोलिस कॉन्स्टेबल हरिश्‍चंद्र बांडे यांच्या फिर्यादीवरून घारगाव पोलिस ठाण्यात, दरोड्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला आहे. 
...... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police arrested a gang of five in preparation for the robbery