दोन गटांतील वाद सोडविताना हल्ल्यात पोलिसाची बोटे तुटली

कोळगाव येथे दोन गटांतील वाद सोडवितानाची घटना
Police fingers were broken in attack Resolving disputes between two groups at Kolgaon
Police fingers were broken in attack Resolving disputes between two groups at Kolgaon

शेवगाव - जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाने लोखंडी कोयत्याने मारहाण केल्याने एका गटाचे पाच जण जखमी झाले. या घटनेतील आरोपीला पोलिस पकडून नेत असताना दुसऱ्या गटातील एकाने हल्ला केल्यामुळे पोलिस कर्मचाऱ्याची दोन बोटे तुटली. ही घटना कोळगाव (ता. शेवगाव) येथे रविवारी (ता. ३) रात्री उशिरा घडली.

याप्रकरणी अण्णा तुकाराम खंडागळे (वय ५५, रा. कोळगाव, ता. शेवगाव) याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसास जखमी केल्याप्रकरणी अर्जुन विठ्ठल खंडागळे (वय-४८) व ज्ञानेश्वर रामा खंडागळे (वय-२०, रा. कोळगाव, ता. शेवगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. जखमी पोलिस कॉन्स्टेबल संदीप उबाळे यांना पुढील उपचारासाठी औरंगाबादला, तर पाच जणांना नगर येथे हलविण्यात आले. याप्रकरणी लक्ष्मी थोरात यांनी फिर्याद दिली आहे.

जुन्या भांडणाच्या कारणावरून अण्णा खंडागळे याने फिर्यादीचे वडील भगवान दशरथ खंडागळे, आई पार्वती भगवान खंडागळे यांना शिवीगाळ करून कोयत्याने वार केले. त्यांनी आरडाओरडा केल्याने नातेवाईक सुनील संतोष हिवाळे, मारिया सुनील शेवाळे धावत आले. आरोपीने फिर्यादीवरही वार केले. थोरात यांच्या फिर्यादीवरून अण्णा खंडागळेविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक विश्वास पावरा करीत आहेत.

पोलिस परशुराम नाकाडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की कोळगाव येथे दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांना मिळाली. त्यांनी त्वरित सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. मी व सहकारी संदीप उबाळे अण्णा खंडागळे यास पकडून घेऊन जात होतो. त्याच वेळेस अर्जुन विठ्ठल खंडागळे याने ‘त्याला सोडा, मी त्याला ठार मारणार आहे’, असे म्हणत कोयत्याने खंडागळेवर वार केला. मात्र, तो त्याला न लागता उबाळे यांच्या हाताच्या बोटावर लागला. यामध्ये त्यांची दोन बोटे तुटली असून, ते गंभीर जखमी झाले.

पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांनी अर्जुन खंडागळे यास कोयत्यासह, तर ज्ञानेश्वर रामा खंडागळे, अण्णा खंडागळेस पोलिसांनी ताब्यात घेतले. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक आशिष शेळके हे करीत आहेत. उबाळे यांना औरंगाबाद येथे उपचारासाठी दाखल केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com