जालना व बुलडाणा जिल्ह्यातून कार, मोटारसायकल चोरांची टोळी पकडली 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 30 October 2020

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी जालना व बुलडाणा जिल्ह्यांतून कार व दुचाकी चोरांची टोळी पकडली.

अहमदनगर : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी जालना व बुलडाणा जिल्ह्यांतून कार व दुचाकी चोरांची टोळी पकडली. त्यांच्याकडून चारचाकी, दुचाकी असा 25 लाखांचा मुद्देमाल जप्त केला. 

हर्षद भगवान गंगतिरे (वय 28, रा. दुसरबीड, ता. सिंदखेड, जि. बुलडाणा), दिनेश राधाकिसन काठोटे (वय 32, रा. हनुमान घाट, जालना), संतोष नामदेव सानप (वय 25, रा. गुंजाळवाडी, दुसरबीड, सिंदखेड) अशी आरोपींची नावे आहेत. 

23 नोव्हेंबर 2011 रोजी गजानन कॉलनी (नवनागापूर) येथून अनिल शिवाजी मेहत्रे यांची पाच लाखांची जीप चोरांनी लांबविली. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दुचाकी चोरीबाबत तपास करण्याच्या सूचना दिल्या. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना, हर्षद गंगतिरे व त्याच्या साथीदारांनी वरील गुन्हा केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने जालना येथे सापळा लावून हर्षद गंगतिरेला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता, अन्य दोन साथीदारांची नावे पुढे आली. त्यांना जालना, बुलडाणा जिल्ह्यांतून ताब्यात घेतले. 

त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यावर गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून चार मोटारी व दोन दुचाकी वाहने जप्त केली. दरम्यान, वरील तीनही आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्यांच्याविरुद्ध तोफखाना, राहाता, श्रीरामपूर, येवला, करमाड, अंबड, खुलताबाद, खडकी, दिघी, रामानंदनगर, सदरबाजार, कदीम, हसनाबाद, तोफखाना पोलिस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. पोलिस कर्मचारी मनोज गोसावी, संदीप पवार, दीपक शिंदे, दत्ता गव्हाणे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police nabbed a gang of car thieves from Jalna and Buldana districts