फडणवीस, पवार, पडळकर यांच्यात रंगला सवाल जवाब; कोकण ते कर्जत व्हाया सांगली

Politics from development works in Karjat Jamkhed constituency
Politics from development works in Karjat Jamkhed constituency

अहमदनगर : भाजपचे आमदार गोपचंद पडळकर व राष्ट्रवादीचे कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्यात चांगलीच झुंपली आहे. दोन दिवसांपूर्वी आमदार पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना जीएसटीवरुन टोला लगावला होता. त्याचाच आधार घेत आमदार पडळकर यांनी आमदार पवार यांच्या मतदारसंघातील रस्त्याच्या प्रश्‍नावरुन लक्ष केले. त्याला त्यांनी उत्तर दिले आहे. यावर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या झुंपली आहे.

विरोधी पक्षनेते फडणवीस काय म्हणाले होते....
दोन दिवसांपूर्वी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन म्हटलं होतं की, ‘कोकणात वादळ आले, काहीच मिळाले नाही. विदर्भात पूर आला, तेव्हा राजा ‘उधार‘ झाला. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीने पीकं उद्धवस्त झाली. पण शेतकऱ्याला कवडीची मदत मिळाली नाही. ...आणि मुख्यमंत्री म्हणतात ‘पिकेल ते विकेल‘.

आमदार रोहित पवार म्हणाले....
यावर आमदार रोहित पवार यांनी फडणवीस यांनी टॅग करत म्हटलं होतं की, “राजा उदार झाला अन् हाती भोपळा दिला असं म्हणताना चुकून पंतप्रधानांऐवजी मुख्यमंत्री म्हणालात”.

पडळकर म्हणाले...
त्यानंतर आमदार पडळकर यांनी म्हटलं आहे की, कर्जत- जामखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांनी राज्यातील, देशातील नेत्यांना सल्ले देण्यापेक्षा आपल्या मतदारसंघातील रस्ते दुरुस्त करावेत. शरद पवार यांच्या खांद्यावर बसून ते स्वतः ची उंची मोजतात. रोहित दादा तुम्ही त्या खांद्यावरन उतारा म्हणजे तुम्ही किती खुजे आहात हे समजेल. मतदारसंघातील कामावर लक्ष द्यावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सल्ले देत बसू नये.

आमदार रोहित पवार यांचे उत्तर...
यावर पडळकर यांना उत्तर देताना आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे की, (फेसबुकवरुन जशाच तसे) ‘आपला व्हिडीओ पाहिला आणि मनातून आनंद झाला. बरं झालं आपण स्वतःहून या विषयाला हात घातलात. यामुळं तरी तुमच्या पक्षाच्या नेत्यांना हे खरं वाटेल. माझ्या मतदारसंघातील या एकाच नाही तर बहुतांश रस्त्यांची ही अवस्था होती आणि अजूनही काही रस्त्यांची अशीच दुरवस्था आहे. कारण या मतदारसंघात गेली पंचवीस वर्षे आपल्याच पक्षाचे आमदार होते. त्यामुळं इथं पंचवीस वर्षांचा बॅकलॉग आहे. मला आमदार होऊन अजून एक वर्षही झालं नाही. तरी मी विकासाचा हा दीर्घ बॅकलॉग भरुन काढण्यासाठी काम करतोय आणि कोरोना नसता तर मतदारसंघातील बरेचसे प्रश्न एव्हाना मार्गीही लावले असते. असो. 

पंचवीस वर्षांपैकी पाच वर्षे याच मतदारसंघातील आमदार हे राज्यात वजनदार खात्याचे मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्रीही होते, तरीही रस्त्यांची ही दुरवस्था आहे, याचा जाब खरंतर तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे होता. पण आपण मोठे नेते आहात त्यामुळं त्यांना जाब विचारणार नाहीत.

आणखी एक मुद्दा म्हणजे कर्जत-जामखेड याच मतदारसंघाची निवड का केली, असा प्रश्न मला मिडियासह अनेकांनी विचारला आणि त्याचं उत्तर मी यापूर्वीही अनेक जाहीर कार्यक्रमांतही दिलंय... ते म्हणजे या मतदारसंघाची अशी दुरवस्था असल्यानं इथं काम करण्यासाठी खूप वाव आहे. हे मी आधीच सांगितलंय, त्यामुळं आपण मिरजगावमधील खराब रस्ता आज दाखवला, यात नवीन काहीच नाही आणि अशा खराब रस्त्यांना कंटाळूनच ते दुरुस्त करण्याची जबाबदारी या मतदारसंघातील लोकांनी विश्वासाने माझ्यावर टाकली आणि मी ती पूर्ण करणारच. मी हवेतून पाणी काढणारा किंवा वाघाच्या जबड्यात हात घालणारा नेता नाही तर जमिनीवर उतरून काम करणारा, लोकांचा विकास करण्याची शपथ घेऊन ती पाळणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळं माझ्या मतदारसंघाची चिंता आपण करू नका.

राहिला प्रश्न साहेबांच्या खांद्यावर बसण्याचा.... तर साहेब हे आमचे नेते, मार्गदर्शक आणि सर्वेसर्वा आहेत आणि त्याचा मला अभिमानही आहे. पण मी कुणाच्या खांद्यावर बसतो याकडं लक्ष देण्यापेक्षा आपण कुठल्या कडेवर आहात असं मी विचारणार नाही, पण आतातरी आहात त्याच ठिकाणी राहिलात तरी आपल्यावरील लोकांचा विश्वास नक्की वाढेल. त्यासाठी आपण जरूर प्रयत्न करा.

यात भाजपचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन पोटरे यांनीही उडी घेतली आहे. निकृष्ठ दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकु असे म्हणणाऱ्या आमदार पवार यांनी मिरजगाव रस्त्याच्या ठेकेदाराला वाचवण्याचा प्रयत्न का चालवला आहे, असा सवाल सोशल मीडियातून उपस्थित केला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनाही लक्ष केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com