के.के. रेंजप्रकरणी नुस्ती छाती काढून काय उपयोग...सुजित झावरेंनी कोणाला मारला टोला

सनी सोनावळे
Tuesday, 11 August 2020

पारनेर तालुक्‍यातील वडगाव सावताळ, गाजदीपूर, ढवळपुरी यांसह अन्य ठिकाणी गेल्या चार दिवसांपासून सैन्यदलातील अधिकारी वाहनांसह मोजमाप करताना दिसत आहेत.

टाकळी ढोकेश्वर ः ""के. के. रेंजसाठी जमीन अधिग्रहण न करण्याबाबत, राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र लढा देऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडविला पाहिजे. नुसती छाती काढून व सहानुभूती व्यक्त करून उपयोग नाही. या विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी महत्त्वाची आहे. प्रसंगी न्यायालयात जाण्याची तयारी ठेवा,'' असे मत मांडतानाच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी विरोधकांना टोला लगावला. 

पारनेर तालुक्‍यातील वडगाव सावताळ, गाजदीपूर, ढवळपुरी यांसह अन्य ठिकाणी गेल्या चार दिवसांपासून सैन्यदलातील अधिकारी वाहनांसह मोजमाप करताना दिसत आहेत. याबाबत झावरे यांनी भूमिका स्पष्ट केली.

हेही वाचा - मुंबईच्या पोलिस अधिकाऱ्याला श्रीगोंद्यात अटक

ते म्हणाले, ""माजी आमदार (स्व.) वसंतराव झावरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार संरक्षणमंत्री असताना तालुक्‍यातील शिष्टमंडळासह त्यांची भेट घेतली होती. त्या वेळी पवार यांनी लष्करप्रमुखांना पाचारण करून या विषयावर पडदा टाकला होता. मात्र, या संदर्भात पुन्हा नोटिफिकेशन निघाल्याने नगरच्या प्रमुख लष्करी अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांसमवेत आपण स्वतः बैठक घेतली होती; मात्र लष्कर आपल्या म्हणण्यावर ठाम होते.

नवीन क्षेपणास्त्राच्या निर्मितीसाठी ही जमीन योग्य असल्याचे लष्कराचे म्हणणे होते. याबाबत मीदेखील सातत्याने पाठपुरावा करीत आहे. मागील वेळी पवार व सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून तत्कालीन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांचीही भेट घेतली होती. त्यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला होता; मात्र तत्कालीन संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी याविषयी नकारात्मक भूमिका घेतली होती. राजकारणविरहित सर्वांच्या समवेत या विषयावर काम करण्याची आपली तयारी आहे.'' 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Politics from the K.K. range issue