सराला बेटावरील सप्ताहाची महती पंतप्रधानांच्या कानी

सतीश वैजापूरकर
Thursday, 23 July 2020

वारकरी संप्रदायाचे आध्यात्मिक केंद्र असलेल्या सराला बेटाच्या विकासाकडे महंत रामगिरी महाराजांनी लक्ष केंद्रित केले.

शिर्डी (अहमदनगर) : वारकरी संप्रदायाचे आध्यात्मिक केंद्र असलेल्या सराला बेटाच्या विकासाकडे महंत रामगिरी महाराजांनी लक्ष केंद्रित केले. दोन वर्षांपूर्वी शिर्डीत झालेल्या हरिनाम सप्ताहाचे निमंत्रण देण्यासाठी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी बेटाची महती त्यांच्या कानावर घातली. या तीर्थक्षेत्राच्या विकासाचा मुद्दाही मांडला. आता खासदार सदाशिव लोखंडे यांनी पाठपुरावा केला, तर केंद्र सरकारकडून किमान रस्त्यांसाठी निधी मिळू शकेल. बेटाला जोडणाऱ्या रस्त्यांची सुरू असलेली हेळसांड तरी थांबेल.

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पंतप्रधान मोदी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे हा विषय सुपूर्द केला. त्याचाच एक भाग म्हणून वैजापूर, सराला बेट ते श्रीरामपूर आणि शिर्डी, पुणतांबे ते सराला बेट, हे दोन्ही महत्त्वाचे रस्ते केंद्र सरकारच्या निधीतून व्हावेत, अशी मागणी त्यांना दिलेल्या निवेदनात केली. आता खासदार लोखंडे यांनी पाठपुरावा केला, तरच हे सर्वाधिक महत्त्वाचे काम मार्गी लागू शकेल.

सराला बेटाची महती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ठाऊक आहे. केंद्र आणि राज्यात या बेटाबाबत आस्था असलेल्या मंडळींचे सरकार आहे. गेल्या दोन वर्षांत रस्त्यांच्या कामांचा पाठपुरावा करण्यासाठी खासदार लोखंडे यांनी वेळ दिला असता, तर फार मोठे आणि महत्त्वाचे काम मार्गी लागले असते. नगर, नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सराला बेटाकडे यायला धड रस्ता नाही, हे मोठे दुर्दैव म्हणाले लागेल. दर एकादशीला या तिन्ही जिल्ह्यांतील 10 ते 15 हजार वैष्णवांचा मेळा बेटावर जमतो. खड्ड्यांत हरवलेल्या रस्त्यांवरून जीवघेणा प्रवास करीत हे भाविक बेटावर दर महिन्याला ये-जा करतात.

हेही वाचा : शाळेचे नाव इंदिरा गांधी होते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शाळाच सोडली होती
बडे राजकीय नेते आणि मंत्र्यांची येथे सतत ये-जा असते. त्यांपैकी कोणालाच रस्त्याचे काम मार्गी लावावे असे वाटत नाही. आजवर या तिन्ही जिल्ह्यांतील संबंधित आमदार-खासदारांना याबाबत फारसे काही करता आले नाही. वैराग्यमूर्ती गंगागिरी महाराजांच्या हरिनाम सप्ताहासाठी जमलेली अलोट गर्दी पाहून आजवर अनेक मुख्यमंत्री, मंत्री आणि नेत्यांनी बेटाच्या विकासाच्या घोषणा केल्या; मात्र त्या कधीच प्रत्यक्षात आल्या नाहीत.

खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट महंत रामगिरी महाराज यांच्या समवेत घेतली. त्यांना सराला बेटाकडे जाणारे दोन प्रमुख रस्ते करण्याबाबत निवेदन दिले. दोन वर्षांत त्याबाबत फारशी हालचाल झाली नाही, हे खरे; मात्र आपण पाठपुरावा करून रस्त्यांची समस्या सोडविणार आहोत.

(बातमीतील संग्रहीत छायाचित्र)

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Prime Minister Narendra Modi was also briefed about Sarla Bet