नगर महापालिका स्थायी समिती सदस्य निवडीचा प्रस्ताव महापौरांकडे

अमित आवारी
Monday, 11 January 2021

हे निवृत्त होण्यापूर्वीही नवीन सदस्य निवडता येतात. म्हणून तडवी यांनी नियमा प्रमाणे स्थायी समितीतील नवीन सदस्य निवडीसाठी महासभा बोलावण्याचा प्रस्ताव महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या समोर मांडला आहे.

नगर ः महापालिकेच्या स्थायी समितीतील आठ सदस्य 1 फेब्रुवारीपासून निवृत्त होत आहेत. नवीन आठ सदस्य निवडीसाठी महासभा बोलविण्याचा प्रस्ताव नगरसचिव एस.बी. तडवी यांनी महापौर बाबासाहेब वाकळे यांना पाठविला आहे. हे नवीन सदस्य निवडले गेल्यास स्थायी समितीसाठी नवीन सभापतीही निवडावा लागणार आहे. 

महापालिकेत 1 फेब्रुवारीला स्थायी समितीतील आठ सदस्य निवृत्त होतात. त्यानुसार मुद्दसर शेख, सुभाष लोंढे, सोनाली चितळे, सुवर्णा जाधव, योगीराज गाडे, कुमार वाकळे, आशा कराळे, गणेश भोसले हे निवृत्त होणार आहेत.

हेही वाचा - शेवटच्या मंगलाष्टकावेळी कोसळला नवरदेव

हे निवृत्त होण्यापूर्वीही नवीन सदस्य निवडता येतात. म्हणून तडवी यांनी नियमा प्रमाणे स्थायी समितीतील नवीन सदस्य निवडीसाठी महासभा बोलावण्याचा प्रस्ताव महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या समोर मांडला आहे. त्यानुसार शिवसेनेचे तीन, बहुजन समाज पक्षाचे एक, भारतीय जनता पक्षाचे दोन तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन सदस्य निवृत्त होत आहेत.

महापौरांनी नवीन सदस्य निवडीसाठी सभा बोलावल्यास तेवढीच नावे आता या पक्षांतील गटनेत्यांना महापौरांकडे बंद लिफाफ्यात सादर करावी लागणार आहेत. या नवीन सदस्य निवडीत नावे यावीत म्हणून आता घोडेबाजार सुरू होण्याची चिन्हे आहेत. 

नवीन सदस्य निवड झाल्यास नवीन सभापती निवडीची मागणी जोर धरणार आहे. त्यामुळे आता या निवडीमुळे मनोज कोतकर यांची खुर्ची डळमळीत होण्याची चिन्हे आहेत. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Proposal for selection of Municipal Standing Committee members to the Mayor