esakal | जामखेडची २० गावे रोहित पवारांमुळे होणार पाणीदार

बोलून बातमी शोधा

रोहित पवार
जामखेडची २० गावे रोहित पवारांमुळे होणार पाणीदार
sakal_logo
By
वसंत सानप

जामखेड : "समृद्ध ग्राम'च्या माध्यमातून तालुक्‍यातील वीस गावांची पाणीपातळी वाढणार असून, येथे पडणाऱ्या पावसाचा थेंबन्‌ थेंब अडविण्याचे नियोजन आमदार रोहित पवारांनी (Rohit pawar) शासन संस्था, लोकसहभाग व लोकप्रतिनिधींच्या सहयोगातून हाती घेतला आहे. पहिल्या टप्प्यात तालुक्‍यातील निम्म्या गावांमध्ये ही कामे साकारली आहेत, तर उर्वरित गावांमध्ये टप्प्याटप्प्याने प्रारंभ होत आहे. अशा पद्धतीने "समृद्ध ग्राम' (samrudhagram) अभियान राबविणारे आमदार रोहित पवार हे पहिलेच आमदार आहेत. (Prosperous village movement in Jamkhed taluka due to Rohit Pawar)

राज्यात पथदर्शी ठरतील अशी कामे या अभियानांतर्गत जामखेड तालुक्‍यात सुरू आहेत. आमदार रोहित पवारांच्या पुढाकारातून आणि त्यांच्या मातुःश्री सुनंदा पवार यांच्या संकल्पनेतून कर्जत- जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून नाम फाउंडेशन, जैन संघटना, लोकसहभाग- शासन व लोकप्रतिनिधींच्या विशेष सहयोगातून ही कामे सुरू आहेत.

हेही वाचा: पारनेर तालुक्यातील ३४ गावांत कोविड सेंटर

या प्रकल्पांतर्गत तालुक्‍यातील सरदवाडी, पिंपळगाव (उंडा), बांधखडक, सावरगाव, तेलंगशी, हळगाव, जवळके, फक्राबाद, आरणगाव, शिऊर, कुसडगाव, वंजारवाडी, धानोरा, झिक्री, पिंपरखेड, तेवाडी, वाघा, बावी, पोतेवाडी, कवडगाव या गावांचा समावेश आहे.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर "आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या शिबिराने या गावांमध्ये "समृद्ध ग्राम' अभियानाची गुढी उभारली. सरदवाडी, आरणगाव, बांधखडक, पिंपळगाव येथील कामे पूर्ण झाली आहेत, तर तेलंगशी, सावरगाव, बांधखडक येथील कामे प्रगतिपथावर आहेत. उर्वरित गावांमध्ये टप्प्याटप्प्याने कामाचा प्रारंभ होत आहे.

सुरू असलेल्या कामांवर संस्था समन्वयक आकाश घोडके, मृदसंधारण उपअभियंता चंद्रकांत मुळे, तालुका कृषी अधिकारी सुधीर शिंदे यांचे नियंत्रण आहे. या अभियानांतर्गत ओढा खोलीकरण, खोल सलग समतल चर, बांधबंदिस्ती, बुजलेल्या जुन्या पोटचाऱ्यांची दुरुस्ती, चाऱ्यांचे खोलीकरण, चाऱ्याजोड प्रकल्प, अशी कामे साकारली जात आहेत. तसेच, "नरेगा'अंतर्गत शोषखड्डे, शौचालये, गायींचे गोठे आदी प्रकरणेही होणार असल्याचे समन्वयक घोडके यांनी सांगितले.

पाणीदार तालुक्यासाठी प्रयत्न

जामखेड हा अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडणारा तालुका असून, येथे पावसाचे पडणारे पाणी अडविण्यासाठी जलसंधारणातील विविध प्रकारची कामे मोठ्या प्रमाणात व्हावीत, याकरिता प्रयत्न आहे. त्याला गावागावांतून मिळणारा प्रतिसादही चांगला आहे.

- रोहित पवार, आमदार, कर्जत-जामखेड

(Prosperous village movement in Jamkhed taluka due to Rohit Pawar)