esakal | १६ न्यायालये एकाच ठिकाणी होण्यासाठी महसुलमंत्र्यांनी केले प्रयत्न
sakal

बोलून बातमी शोधा

Revenue Minister inspects new court building at Sangamner

न्यायलयीन कामकाज एकत्रीत व सुसूत्रबध्दरित्या व्हावे, यासाठी तालुक्यातील घुलेवाडी फाटा येथे उभारलेल्या प्रशस्त व अद्ययावत न्यायालयाच्या इमारतीची पहाणी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

१६ न्यायालये एकाच ठिकाणी होण्यासाठी महसुलमंत्र्यांनी केले प्रयत्न

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर (अहमदनगर) : न्यायलयीन कामकाज एकत्रीत व सुसूत्रबध्दरित्या व्हावे, यासाठी तालुक्यातील घुलेवाडी फाटा येथे उभारलेल्या प्रशस्त व अद्ययावत न्यायालयाच्या इमारतीची पहाणी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. या वेळी या नवीन वास्तूत लवकरच कामकाज सुरु होण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.

संगमनेरातील सर्व प्रशासकिय इमारतींनी कात टाकली असून, दिमाखदार स्वरुपात त्या उभ्या आहेत. यात प्रमुख्याने पंचायत समिती, नगरपालिका, प्रांताधिकारी कार्यालयासह कृषी, भारतीय पोस्ट अशी विविध विभाग असलेली यशवंतराव चव्हाण प्रशासकिय भवन ही इमारत, तहसीलदार कार्यालय, भव्य क्रीडासंकुल, कवी अनंतफंदी खुले नाट्यगृह, शासकीय विश्रामगृह, प्रवरा नदीवरील विविध पूल, संगमनेर बाह्यवळण रस्ता, पोलिस कर्मचारी वसाहत आदींसह सर्वात मोठे हायटेक बसस्थानकाचा समावेश आहे. 

हेही वाचा : कोरोना काळात भावनेपेक्षा वस्तूस्थितीला महत्व द्या : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
संगमनेर येथे मोठे न्यायालयीन कामकाज चालते. यासाठी तीन जिल्हा, एक दिवाणी व पाच वरिष्ठ स्तर न्यायाधीश, पाच दिवाणी व प्रथम दंडाधिकारी न्यायाधीश, अशी न्यायालये कार्यरत आहेत. सध्या प्रलंबित प्रकरणांची संख्या अधिक असून ती दिवसेंदिवस वाढत आहे. भविष्यात येथे औद्योगिक व कामगार न्यायालये होण्याची शक्यता आहे. ही सर्व 16 न्यायालये एकाच ठिकाणी होण्यासाठी बाळासाहेब थोरात यांनी आपल्या महसूलमंत्री पदाच्या काळात राज्य सरकारकडून 33 कोटींच्या निधीतून या भव्य व अद्ययावत इमारतीचे निर्माण केले आहे.

वकील असोसिएशनच्या मागणीनुसार महसूल विभागाची काही जागा वकील संघासाठीही उपलब्ध करून दिली आहे. तसेच सरकारकडून नवीन निधीची मंजूरी घेवून इमारतीत अंतर्गत जोड रस्ते, डांबरीकरण व मजबुतीकरण, संरक्षक लोखंडी द्वार, जमीन सपाटीकरण, दुचाकी चारचाकी वाहने व न्यायाधीशांसाठी स्वतंत्र वाहन तळ, जनरेटर तसेच इमारतीचे सुशोभिकरण व फर्निचर आदी बाबींसाठी निधी मंजूर करुन घेतला होता.

ही इमारत तालुकास्तरावरील राज्यातील सर्वात वैभवशाली ठरणार असून, या ठिकाणी लवकरच न्यायालयीन कामकाज सुरु होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी बाबा ओहोळ, सुनंदा जोर्वेकर, विश्‍वास मुर्तडक, दिलीप पुंड, वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. सुहास आहेर, अजय फटांगरे, के. के. थोरात, अ‍ॅड. त्र्यंबक गडाख, अ‍ॅड. अशोक हजारे, अ‍ॅड. नानासाहेब शिंदे, बार असोसिएशनचे अ‍ॅड. सुनील गेठे, अ‍ॅड. अमित सोनवणे, अ‍ॅड. मधुकर गुंजाळ, अ‍ॅड. प्रकाश राहाणे, अ‍ॅड. सचिन डुबे, सिताराम राऊत, घुलेवाडीचे सरपंच सोपान राऊत, वंदना गुंजाळ, सुरेश थोरात, कैलास पानसरे आदींसह प्रांताधिकारी डॉ. शशीकांत मंगळूरे, तहसीलदार अमोल निकम, उपविभागीय पोलिस अधिकारी रोशन पंडीत, निरीक्षक सुनिल पाटील, अभय परमार आदि उपस्थित होते.

संपादन : अशोक मुरुमकर

loading image