खासदार डॉ. विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस उत्पादकांना चांगला भाव देऊ

विलास कुलकर्णी
Tuesday, 18 August 2020

डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखाना तालुक्याची कामधेनु आहे. कारखान्याचा आर्थिक गाडा स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे. यासाठी कारखान्यात राजकारणाला थारा नसेल.

राहुरी (अहमदनगर) : डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखाना तालुक्याची कामधेनु आहे. कारखान्याचा आर्थिक गाडा स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजे. यासाठी कारखान्यात राजकारणाला थारा नसेल. पक्षभेद, गट- तट बाजूला ठेवून, सर्वांना बरोबर घेऊन कारखान्याला ऊर्जितावस्था आणण्यासाठी प्रयत्न करील, असे तनपुरे कारखान्याचे अध्यक्ष नामदेव ढोकणे यांनी सांगितले.

कारखान्याच्या 2020- 21 गळीत हंगामासाठी मिरच्या रोलर पूजन प्रसंगी ढोकणे बोलत होते. उपाध्यक्ष दत्तात्रेय ढूस, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, भाजपाचे ज्येष्ठ नेते आसाराम ढूस, मावळते उपाध्यक्ष शामराव निमसे व संचालक मंडळ उपस्थित होते.

ढोकणे म्हणाले, मागील चार- पाच वर्षात भरपूर मानसिक त्रास झाला. परंतु, सूड भावनेने वागणार नाही. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ऊस उत्पादकांना चांगला भाव देऊ. कारखान्याच्या ऊर्जितावस्थेसाठी राज्य सरकारच्या पातळीवरील प्रश्न सोडविण्यासाठी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा बँकेतील प्रश्न सोडविण्यासाठी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांची मदत घेऊ.

कुटुंबात तीस वर्षापासून कारखान्याचे संचालक पद आहे. स्व. रामदास धुमाळ यांनी आमच्या कुटुंबाला राजकारणात आणले. पहिल्यांदा अध्यक्षपद मिळाले. यावर्षी धरण भरणार आहे. पाऊस भरपूर आहे. परंतु सभासदांनी तालुक्याबाहेरील कारखान्याला ऊस देऊ नये, असे आवाहन ढोकणे यांनी केले.

संचालक सुरसिंग पवार, भारत तारडे, कामगार युनियनचे अध्यक्ष ज्ञानदेव आहेर यांची भाषणे झाली. संचालक महेश पाटील यांनी आभार मानले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Roller Pujan of Baburao Bapuji Tanpure Cooperative Sugar Factory in Rahuri taluka