समाजवादी जनपरिषदेचे हिवरगाव पावसात आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 12 December 2020

अन्यायकारक कायदे लादून देशभरातील कामगार व शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचे सांगत, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

संगमनेर ः शेतकरी व कामगारांवर अन्याय करणारे केंद्र सरकारचे कृषी व कामगार विधेयक रद्द करण्याच्या मागणीसाठी आज नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गावरील तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील टोलनाक्यावर टोलबंद आंदोलन करण्यात आले.

समाजवादी जनपरिषद व अंगणवाडी कर्मचारी सभेच्या प्रदेशाध्य़क्ष अॅड. निशा शिवूरकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात, कृषी विधेयकाच्या विरोधात देशभरात सुरु असलेल्य़ा किसान आंदोलनाला तसेच दिल्लीतील आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा - नगरचे कलेक्टर राहतात महालात, पाचशे वर्षांपासून मिळतो मान

किसान संघर्ष समितीच्या वतीने आज देशभरातील टोलनाक्यांवर टोलबंद आंदोलन करण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा टोलनाक्यावर आंदोलकांनी सकाळी 10 ते 12 या दोन तासात निदर्शने केली.

अन्यायकारक कायदे लादून देशभरातील कामगार व शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचा केंद्र सरकारचा डाव असल्याचे सांगत, शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

या वेळी या मार्गावरुन प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांनी शेतकरी व कामगारांना पाठींबा देणाऱ्या घोषणा देत या चळवळीला पाठींबा जाहीर केला. यावेळी तीनही काळे कृषी कायदे रद्द करावेत, शेतमालाला हमी भाव देण्यासाठी कायदा करावा व नव्या कृषी धोरणासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे अशा मागण्या करण्यात आल्या.

आज दिवसभर कोणत्याही वाहनाकडून पथकर वसूल करु नये असे निवेदन टोल प्लाझाच्या व्यवस्थापकाला देण्यात आले. या आंदोलनात समाजवादी जन परिषद, भारतीय कम्युनिष्ट पक्ष, अंगणवाडी कर्मचारी सभा, अखिल भारतीय किसान सभा, वैद्यकिय प्रतिनिधी संघटना, फॉरेस्ट वाहतूकदार संघटना आदींसह कॉ. ज्ञानदेव सहाणे, शांताराम गोसावी, अनिल गुंजाळ, अनिल कढणे, सुनंदा रहाणे, प्रा. शिवाजी गायकवाड, बाबुराव गायकवाड, दशरथ हासे, भास्कर पावसे आदींसह महिलांचा लक्षणीय सहभाग होता.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Samajwadi Jan Parishad Hivargaon agitation