esakal | आपघातातील जखमींवर त्वरीत उपचार व्हावेत म्हणून मिरजगावमध्ये विशेष ट्रॉमा केअर सेंटर करा
sakal

बोलून बातमी शोधा

Set up a special trauma care center in Mirajgaon for quick treatment of accidental injuries

कर्जत- जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.

आपघातातील जखमींवर त्वरीत उपचार व्हावेत म्हणून मिरजगावमध्ये विशेष ट्रॉमा केअर सेंटर करा

sakal_logo
By
निलेश दिवटे

कर्जत (अहमदनगर) : कर्जत- जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी खर्डा ते कुर्डूवाडी हा पालखी मार्ग पूर्णत्वास नेण्याच्या मागणीसह मतदारसंघातील इतर रस्त्यांच्या विकासासाठी निधीस मान्यता देण्याची मागणी केली. याबरोबर अपघातातील जखमींवर वेळेत उपचार करता यावेत यासाठी मिरजगाव परिसरात विशेष ट्रॉमा केअर सेंटर उभारण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

कर्जत- जामखेड मतदारसंघातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे आमदार म्हणून निवडून आल्यापासून या रस्त्यांच्या कामासाठी रोहित पवार हे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यांनी दिल्लीत गडकरी यांची दुसऱ्यांदा भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले आहे.

हेही वाचा : नगर- करमाळा- सोलापूर महामार्गाच्या कामासासाठी आमदार रोहित पवार यांनी घेतली गडकरींची भेट
पैठण ते पंढरपूर या पालखी महामार्गावरील खर्डा हे ऐतिहासिक व धार्मिक दृष्ट्या महत्वाचे ठिकाण आहे. संत एकनाथ महाराज, संत भगवानबाबा, संत गोरा कुंभार यांच्या पालख्यांसह असंख्य वारकरी या मार्गाने पंढरपूरला जातात. त्यामुळे खर्डा ते कुर्डूवाडी हा रस्ता अत्यंत महत्वाचा आहे. तो पूर्णत्वास नेल्यास सोलापूर, नगर हे जिल्हे जोडले जातीलच, शिवाय येथील विकासालाही हातभार लागेल व वारकऱ्यांचीही गैरसोय होणार नाही.
अहमदनगर ते बीड राष्ट्रीय महामार्ग ५६१ हा चिंचोडे पाटील, धानोरे, कडा, आष्टी व जामखेड या शहरी भागासह अनेक दुर्गम भागांना जोडला जातो, त्यामुळे या रस्त्यासाठी बजेटमध्ये भरीव तरतूद करण्याची मागणी करतानाच या मार्गाचा विकास आराखडा संबंधित विभागाकडे असून याकडे लक्ष देण्याची गरज आहे. यामध्ये अहमदनगर ते धानोरा, धानोरा ते जामखेड, जामखेड ते रोहतवाडी- चुंबळी फाटा आणि रोहतवाडी ते बीड या मार्गांचा समावेश आहे. अहमदनगर, जामखेड व बीड या प्रमुख ठिकाणांना जोडणारा हा मार्ग असल्याने आगामी बजेटमध्ये या रस्त्यांसाठी अपेक्षित निधी मिळेल, अशी अपेक्षा आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली.

अहमदनगर-बीड आणि श्रीगोंदा-जामखेड ते बीड हे प्रमुख मार्ग कर्जत-जामखेड या मतदारसंघातून जातात. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. या मार्गाचे काँक्रीटीकरण केल्यास त्याचा या भागातील अनेक गावांच्या विकासासाठी मोठा फायदा होणार आहे. त्यासाठीही आमदार रोहित पवार यांनी गडकरी यांना गळ घातली. आंध्रप्रदेशातून शिर्डी येथे दर्शनासाठी जाणारे भाविक पूर्वी भूम, जामखेड, नगर या मार्गाने जात असत. मात्र गेल्या काही वर्षात हा रस्ता खराब असल्याने या मार्गाने येणाऱ्या भाविकांची संख्या घाटली आहे. त्यामुळे हा रस्ता चांगला झाला आणि भूमच्या बाजूनेही तो दुरुस्त केला गेला तर या तिन्ही तालुक्यात अर्थकारण वाढून त्यांचा विकास होण्यास मदत होईल. तसेच प्रत्येक महामार्गावर हॉटेल व इतर व्यवसाय सुरू करण्यासाठी स्थानिक युवांना प्राधान्य देण्याचीही गरज आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाने व अन्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. अनेकदा अपघात झाल्यानंतर जखमींना उपचारासाठी नगर, पुणे, बारामती अशा लांबच्या ठिकाणी घेऊन जावे लागते. परिणामी वेळेत उपचार न मिळाल्याने जखमींच्या जीवितास धोका निर्माण होतो. या सर्वांचा विचार करून कर्जत तालुक्यात मिरजगाव येथे ट्रॉमा केअर सेंटर सुरु करण्यात यावे किंवा त्यासाठी राज्य सरकार किंवा एखाद्या संस्थेला ट्रॉमा केअर सेंटर सुरु करण्यास जागा उपलब्ध करून देण्याची मागणीही आमदार रोहित पवार यांनी नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.

दरम्यान, कर्जत-जामखेड मतदारसंघाशी संबंधित रस्त्यांच्या विकासासाठी लोकांच्या हिताचा विचार करुन सकारात्मक निर्णय घेतला जाईल आणि यातील काही रस्त्यांसाठी येत्या अंदाजपत्रकात भरीव तरतूद केली जाईल, असा विश्वास गडकरी यांनी केल्याचे समजते. दरम्यान, मतदारसंघाच्या विकासासाठी विविध पातळ्यांवर पाठपुरावा सुरू असून खासदार डॉ. सुजय विखे हेही लोकांच्या हितासाठी पाठपुरावा करत असतील आणि यापुढेही करतील, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला.

संपादन : अशोक मुरुमकर