esakal | डिंभे-माणिकडोह बोगदाप्रश्नी शरद पवारांनी घातले लक्ष; लवकरच बैठक
sakal

बोलून बातमी शोधा

Sharad Pawar

डिंभे-माणिकडोह बोगदाप्रश्नी शरद पवारांनी घातले लक्ष; लवकरच बैठक

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

श्रीगोंदे (जि. नगर) : कुकडी प्रकल्पातील प्रलंबित डिंभे ते माणिकडोह बोगदाप्रश्नी आता खुद्द शरद पवार यांनी लक्ष घातले आहे. लाभक्षेत्रातील मंत्री, आमदारांसह प्रमुख नेत्यांची बैठक घेण्याचे आदेशच त्यांनी दिल्याची माहिती राज्य बाजार समिती महासंघाचे संचालक बाळासाहेब नाहाटा यांनी दिली.


नाहाटा यांच्यासह बाबासाहेब भोस, अख्तर शेख, बापूराव सिदनकर यांनी पवार यांची पुणे येथे भेट घेतली. त्याबद्दल माहिती देताना नाहाटा म्हणाले, की कुकडी प्रकल्पातील बोगद्याबाबत पवार यांना निवदेन दिले. हा बोगदा झाला तर पारनेर, श्रीगोंदे, कर्जत व करमाळा तालुक्यांना फायदा होईल. याबाबत चर्चाच होती. कार्यवाही अजूनही होत नसल्याचे त्यांना सांगितले. या प्रकल्पाला केंद्रीय जल आयोगाने मान्यता दिली असली, तरी राज्य तांत्रिक सल्लागार समितीच्या तीन बैठकांनंतरही मार्ग निघालेला नाही. हा बोगदा अतिशय महत्त्वाचा असल्याने तो व्हावा, यासाठी पवार यांना साकडे घातले. पवार यांनी त्यावर लगेच संबंधितांना, जलसंपदामंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह लाभक्षेत्रातील आमदार अतुल बेनके, नीलेश लंके, रोहित पवार, संजय शिंदे, माजी आमदार राहुल जगताप यांच्यासह नाहाटा व भोस यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याच्या सूचना दिल्याचेही नाहाटा यांनी सांगितले.

हेही वाचा: पर्यटकांना खुणावतोय निसर्गसौंदर्याने नटलेला रामेश्‍वर धबधबा


नाहाटा म्हणाले, की हा बोगदा झाल्यास कुकडीच्या डाव्या कालव्याला उन्हाळी हंगामात येणारी पाण्याची अडचण कमी होऊन, शेतातील उभी पिके जगण्यास मदत होतानाच पिण्याचा पाणीप्रश्नही आपोआप कमी होईल. आता याप्रश्नी शरद पवार यांनीच लक्ष घातल्याने नगर व सोलापूर जिल्ह्यांचा महत्त्वाचा प्रश्न प्रत्यक्षात निकाली निघण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हेही वाचा: PHOTOS : बैलाच्या पाठीवर रंगले राजकारणाचे प्रतिबिंब

loading image
go to top