
Samruddhi Expressway : वाहन तपासूनच ‘समृद्धी’वर होणार एन्ट्री; अपघात रोखण्यासाठी ‘परिवहन’चा पुढाकार
शिर्डी - शासनाच्या परिवहन विभागाच्या वतीने हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर अपघातांत वाढ होत आहे. हे अपघात रोखण्यासाठी आता वाहनांचे टायर तपासल्याशिवाय ते महामार्गावर न सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी महामार्गावर शिर्डी येथे वाहनांचे टायर तपासणी केंद्र सुरू होत असून, शिर्डी इंटरचेंज येथील टोलनाक्यावर उद्या (ता. ९) सकाळी साडेदहा वाजता परिवहन आयुक्तांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होत आहे.
हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा शिर्डी ते नागपूर व दुसरा टप्पा शिर्डी ते भरवीर हा वाहतुकीसाठी सुरू झाला आहे. समृद्धी महामार्गावर बहुतांश अपघात वाहनांचे टायर फुटल्यामुळे होत आहेत. या अपघातांना प्रतिबंध बसावा, यासाठी राज्य परिवहन विभाग व राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी सीएट टायर उत्पादक कंपनीच्या तांत्रिक सहकार्याने रस्तासुरक्षेचा निर्णय घेत, समृद्धीवरून जाणाऱ्या वाहनांच्या टायर तपासणीचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाने महामार्गावर वाहन चालविताना योग्य गुणवत्तेचे टायर, तसेच वेगमर्यादेचे निरीक्षण करण्यात येणार आहे.
वाहनधारकांचा प्रवास सुरक्षित व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमात वाहनधारकांना वाहनात नायट्रोजन हवा भरणे, बेसिक एअर फिलिंग, टायर वेअर तपासणी, व्हॉल्व्ह तपासणी, व्हॉल्व्ह पिन चेक व रिप्लेसमेंट, बेसिक पंक्चर दुरुस्ती, टायर वेअर चेक यंत्राचे वितरण आदी तपासणी सुविधा मोफत दिल्या जाणार असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ऊर्मिला पवार यांनी स्पष्ट केले.
टायर तपासणी केंद्राच्या माध्यमातून वाहनांची मोफत तपासणी केली जाणार आहे. या सुविधेचा जास्तीत वाहनधारकांनी लाभ घेणे गरजेचे आहे. ‘विनाअपघात सुरक्षित प्रवास’ हे वाहनचालकांनी कायम लक्षात ठेवले पाहिजे.
- ऊर्मिला पवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
जिल्ह्याचे कार्यक्षेत्र
शिर्डीकडून जाणाऱ्या व नागपूरकडून येणाऱ्या वाहनांना अपघात होऊ नये यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभाग काम करत आहे. हद्दीतील प्रत्येक स्पॉटवर २४ तास सहायक मोटार वाहन निरीक्षक कार्यरत आहेत.
दृष्टिक्षेपात...
समुपदेशन केलेल्या वाहनचालकांची संख्या - १४६६
टायर खराब असल्याने परत परत पाठविलेली वाहने - १०५
अतिवेगाने वाहन चालविणाऱ्या चालकांची संख्या- ३२१