श्री क्षेत्र देवगड यात्रोत्सव रद्द, दत्तजयंती सोहळा होणार साधेपद्धतीने

सुनील गर्जे 
Wednesday, 16 December 2020

श्री क्षेत्र देवगड येथील श्री दत्तजयंती उत्सवानिमित्त होणारा यात्रोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  रद्द करण्यात आला.

नेवासे (अहमदनगर) : तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील श्री दत्तजयंती उत्सवानिमित्त होणारा यात्रोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  रद्द करण्यात आला असून मंगळवार (ता. २९) रोजी दत्तजयंती निमित्ताने होणारा श्री दत्त जन्म सोहळा साध्यपध्दतीने साजरा करण्याचा निर्णय श्री दत्त मंदिर देवस्थानने घेतला असल्याची माहिती देवस्थान प्रमुख गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी दिली.  दरम्यान  देवस्थानने या निर्णयाबाबत प्रसिद्धी पत्रकही काढले आहे.

या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे की,  श्री क्षेत्र देवगड येथे दरवर्षी दत्तजयंती निमित्त भगवान दत्तात्रयांचा जन्मसोहळा मोठ्या उत्साहात साजरा  होतो, मात्र यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जग भीतीच्या सावटाखाली वावरत असतांना सावधगिरीची उपाययोजना म्हणून शासन प्रशासनाने देशातील तसेच राज्यातील सर्वच सार्वजनिक तथा धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनास बंदी केलेली आहे.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कार्तिकी एकादशी आणि माऊलींच्या संजीवन समाधी सोहळयाच्या अनुषंगाने शासन प्रशासनाने श्री क्षेत्र पंढरपूर व श्री क्षेत्र आळंदी येथे जारी केलेल्या संचारबंदी आदेशाच्या अनुभवामुळे श्री दत्त मंदिर संस्थान प्रशासन व भाविकांच्या विचारविनिमायातून या वर्षीचा श्री दत्त जयंती सोहळा अतिशय साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय संस्थान प्रशासनाने घेतला आहे. 

श्री दत्त मंदिर संस्थानच्या झालेल्या निर्णयानुसार या वर्षी श्री दत्त जयंती निमित्त होणारे सर्व धार्मिक कार्यक्रम हे श्रीं च्या मंदिरामध्ये स्थानिक सेवेकरी तथा विदयार्थी वर्गाच्या उपस्थितीत पार पडणार असून नित्यामिषेक ही स्थगित ठेवलेले आहेत. तसेच देवगड प्रांगणात भरणारी  यात्रा ही संपूर्णपणे रद्द ठेवण्यात आलेली आहे. श्री दत्त जयंती सप्ताहाच्या दरम्यान दुरूनच दर्शनाची व्यवस्था करण्यात आलेली असून दत्तजयंती दिनी  मंगळवार (ता. २९) डिसेंबर रोजी दुपारी चार वाजले  पासून देवस्थानचे महाद्वार बंद ठेवण्यात येणार आहे. 

दसरम्यान यात्रेसाठी येणाऱ्या सर्व व्यावसायिकांनी या वर्षी आपापली दुकाने आणू नये, दिंडीसोहळे आणणाऱ्या भाविकांनी दिंडीसोहळे रद्द करावेत आणि भाविकांनी मंदिर परिसरामध्ये मास्क तथा स्वच्छतेचे व सामाजिक अंतराचे नियम कटाक्षाने पाळावेत व मंदिर प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन गुरुवर्य भास्करगिरी महाराज व दत्त मंदिर संस्थानने केले आहे. 

दत्तजन्म सोहळा दिसणार एलईडी स्क्रीनवर  
श्री दत्तजन्म सोहळा श्री दत्त मंदिरातच होणार असल्याने भाविकांची गैरसोय होऊ नये तसेच श्री दत्तजन्मसोहळा सर्वाना पाहता यावा यासाठी मंदिर परिसर तसेच पार्किंग क्षेत्रात ठिकठिकाणी एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहे.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shri Kshetra Devgad Yatra festival canceled