भाजीपाल्याचे दर कोसळले; श्रीरामपूर बाजार समितीत आवक वाढली

गौरव साळुंके
Wednesday, 16 December 2020

श्रीरामपूर येथील बाजार समितीच्या भाजीपाला लिलावात आवक वाढल्याने पालेभाज्यांचे दर कोसळले.

श्रीरामपूर (अहमदनगर) : येथील बाजार समितीच्या भाजीपाला लिलावात आवक वाढल्याने पालेभाज्यांचे दर कोसळले. लॉकडाउननंतर १५ रुपयांना मिळणारी मेथीच्या भाजीची जुडी सध्या केवळ चार रुपयांना विकत असल्याने शेतकरीवर्गाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. तालुक्यातील अनेक भागात भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. 

हेही वाचा : घोडेगाव मंदिरातील चोरीप्रकरण पेटणार! तपासावरुन पोलिस- ग्रामस्थांमध्ये शाब्दिक चकमक
यंदा शिरसगाव, खंडाळा, वाकडी, आंबी आणि केसापूर शिवारात फ्लॉवर, कोबीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले आहे. पूर्वी तालुक्यातून नगर, नाशिक आणि पुणे परिसरात मोठ्या प्रमाणात भाजीपाला पाठविला जात होता. परंतु, गेल्या काही दिवसांत भाजीपाल्यांचे दर सलग घटत आहेत. त्यात आवक वाढल्याने भाजीपाला पाठवणे ठप्प झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला असला, तरी त्यातून उत्पादनखर्चही निघत नसल्याने भाजीपाला उत्पादक अडचणीत आले आहेत.

प्रारंभी तालुक्यातील अनेक भागात पावसामुळे भाजीपाला शेतातच सडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन केल्याने भाजीपाला बाजारात आणून विक्री करणे कठीण झाले. त्यामुळे अनेकांनी उभ्या पिकांत जनावरे सोडली, काहींनी बांधावर शेतमाल फेकून दिला. लॉकडाउन शिथिल केल्यानंतर व्यवहार सुरळीत होताना, बाजारातील गर्दी वाढली. भाजीपाल्याची मागणी वाढत गेली. मात्र, सततच्या पावसामुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाल्याने बाजारातील आवक घटली. त्यामुळे दरात काही अंशी वाढ झाल्याचे दिसले.

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
दिवाळीनंतर भाजीपाल्यास चांगले दर मिळण्याची आशा असल्याने शेकडो शेतकरी भाजीपाला उत्पादनाकडे वळले. परंतु, सध्या बाजारात मागणीपेक्षा जास्त भाजीपाला येत असल्याने दर घटले आहेत. 

भाजीपाल्याचे मंगळवारचे दर (क्विंटलमध्ये) कोबी .......... ४०० ते ५०० 
फ्लॉवर ......... ४०० ते ५०० 
बटाटे ........ ३००० 
काकडी ........... ८०० ते १००० 
मिरची ........... २००० 
भेंडी ........... १५००-२००० 
वाल ............ १००० 
वांगी ..........५००-१००० 
दोडका ......... १०००-१५००
कारले ........ १०००-१५०० 
टोमॅटो ......२५० ते ३०० (प्रति क्रेट)
(शंभर जुड्यांचा भाव) 
मेथी ...... ३००-४०० 
कोथिंबीर .......१००-२००
पालक ........७००-१०००

फ्लॉवर, कोबीचे क्षेत्र वाढले 
बाजारात फ्लॉवर, कोबीची मोठी आवक आहे. यंदा शिवारात फ्लॉवर, कोबीची लागवड वाढली आहे. आवक वाढल्याने भाजीपाल्यांचे दर सलग घटत आहेत. भाजीपाला उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Shrirampur taluka the prices of vegetables have gone up