परवाने असूनही शिर्डीत शटर डाउनच

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 मे 2020

दिवसाकाठी लाखोंची उलाढाल करणारी हार, प्रसाद, लॉकेट, फोटो, नाश्‍ता व शीतपेयांची दुकाने ग्राहकांअभावी बंद ठेवणे भाग पडले आहे. भाविक हा येथील एकमेव ग्राहक आहे. तो जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत येथील बाजारपेठ अशी बंद राहणार आहे. 

शिर्डी ः दुकाने उघडण्याची परवानगी दिली, तरीही साईबाबांच्या शिर्डीतील नव्वद टक्के बाजारपेठा बंद आहेत. लॉकडाउनपूर्वी ज्या दुकानमालकांना आपल्या दुकानाचे रोजचे एक ते पाच हजारांपर्यंतचे भाडे मिळायचे. अशा मोक्‍याच्या ठिकाणी शेकडो दुकानांचे कुलूप परवानगी असूनही उघडलेले नाही.

दिवसाकाठी लाखोंची उलाढाल करणारी हार, प्रसाद, लॉकेट, फोटो, नाश्‍ता व शीतपेयांची दुकाने ग्राहकांअभावी बंद ठेवणे भाग पडले आहे. भाविक हा येथील एकमेव ग्राहक आहे. तो जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत येथील बाजारपेठ अशी बंद राहणार आहे. 
नगरपंचायत कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, बाजारपेठेत हार, फुले, प्रसाद व भाविकांना विविध वस्तू विकणारी जवळपास एक हजार दुकाने आहेत.

फेरीवाल्यांची संख्या त्याहून अधिक आहे. सहाशेहून अधिक हातगाड्या आहेत. त्याद्वारे वर्षाकाठी चाळीस लाख रुपयांचे उत्पन्न मिळत असे. येथील हॉटेल व्यावसायिक कमलाकर यांनी दिलेल्या माहितीनुसार भाविकांना विविध वस्तू विकणाऱ्या एक हजार दुकानांपैकी जवळपास नव्वद टक्के दुकाने भाड्याने देण्यात आली. दुकानमालकांना त्यांच्या एका दुकानापासून रोज एक ते पाच हजारांपर्यंतचे उत्पन्न विनासायास मिळते.

हेही वाचा - चंद्रकांत पाटील यांचे अंगण कोणतं

काही दुकानांना तर दहा हजार ते वीस हजार रुपये प्रतिदिन एवढे प्रचंड भाडे आहे. बाजारपेठेत एका मागे एक असे दोन-तीन व्यावसायिक वेगवेगळे व्यवसाय करतात. एका दुकानातून मालकांना अशी तिप्पट प्राप्ती होते. भाडे अधिक द्यावे लागते. ते अर्थातच भाविकांकडून वसूल करावे लागते.

आता भाविक नसल्याने दुकानदार आणि दुकानमालक या दोघांचीही मोठी कमाई बुडाली. परवानगी असूनही बाजारपेठ बंद ठेवण्याची वेळ आली. सध्या शहरात पंचवीस ते तीस किराणा, पंधरा ते वीस जनरल स्टोअर्स, पन्नास ते साठ बेकरी, मिठाई व पादत्राणांची दुकाने उघडली आहेत. किराणा वगळता अन्य दुकानांत ग्राहकांची वर्दळ जाणवत नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shutter down in Shirdi despite licenses