श्रीगोंदे बाजार समितीत "सही रे सही" नाट्य ः नामधारी सभापती भोईटे म्हणतात, राजीनामाच देतो

Speaker Bhoite says he will resign
Speaker Bhoite says he will resign

श्रीगोंदे : एकेकाळचे कट्टर विरोधक असणारे पाचपुते व नागवडे हे दोन गट बाजार समितीत एकत्र असल्याने सगळी सत्ता त्यांच्याच ताब्यात आहे. मात्र, सभापती धनसिंग भोईटे हे केवळ नामधारी अाहेत. सव्वातीन वर्षांपूर्वी त्यांचे काढलेले सह्यांचे अधिकार नेते एकत्र असूनही परत मिळालेले नाहीत.

आमदार बबनराव पाचपुते व राजेंद्र नागवडे हे एका पक्षात असताना, तसेच त्यांची सत्ता असणाऱ्या समितीतील सभापती मात्र नामधारी, असे विरोधाभासी चित्र येथे आहे. 

बाजार समितीची निवडणूक सव्वाचार वर्षांपूर्वी झाली. तीत नागवडे व जगताप गटाने एकत्रित 10, तर विरोधी पाचपुते गटाने 8 जागा जिंकल्या. त्यानंतर सव्वा वर्षे बाळासाहेब नाहाटा यांनी नागवडे गटाकडून सभापती म्हणून कारभार हाकला. त्यानंतर ठरल्याप्रमाणे सभापती बदल होऊन नागवडे यांचे विश्वासू धनसिंग भोईटे यांना सभापती केले. तोपर्यंत सगळे ठीक होते. मात्र, सभापतींना सह्यांचे अधिकार देताना, नागवडे व राहुल जगताप यांना मानणाऱ्या नाहाटा व एका संचालकाने दुसऱ्या गटात प्रवेश केला. त्यामुळे भोईटे यांच्याऐवजी विभागून सह्यांचे अधिकार देण्यात आले. सध्या सह्यांचे अधिकार कोणालाही असले, तरी कारभार उपसभापती वैभव पाचपुतेच पाहत आहेत.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत नागवडे यांनीच भाजपमध्ये प्रवेश करीत पाचपुते यांना मदत केली. ते आजही भाजपमध्येच असले, तरी त्यांचे समर्थक भोईटे नामधारीच आहेत. त्यांना कुठलेही अधिकार नाहीत. ते सभापती आहेत, हेही दोन्ही नेते विसरले की काय, अशी शंका येते. या सगळ्या परिस्थितीत बाजार समितीचा कारभार कसा सुरू आहे, याबद्दल कुणीही चांगली वा वाईट चर्चा करीत नाही. मात्र, तेथील राजकारण काही दिवसांतच ढवळून निघणार, हे मात्र नक्की! 
 

माघार तरी कुठवर घ्यायची

सभापती भोईटे म्हणाले, ""दिवंगत शिवाजीराव नागवडे यांचा मी प्रामाणिक कार्यकर्ता राहिलो. सत्तेची हाव कधीच नव्हती. पहिल्या वेळी आपला हक्क असतानाही, नाहाटा यांना सभापती केले. त्यानंतर आपली वेळ आल्यावर, नाहाटा बाहेर पडले, तरी आपण कुणावर नाराज झालो नाही. दोन्ही नेते एकत्र आहेत, तरी आपल्याला साधा सहीचा अधिकार नाही, याचे दु:ख आहे. मात्र, त्याचे कधीही प्रदर्शन केले नाही. जे कोणी समितीचा कारभार करतात, त्यांच्यात हस्तक्षेप करीत नाही. मात्र, आता नामधारी सभापतिपदाचा राजीनामा देऊन बाहेर पडावे, असे वाटते. याबाबत सहकाऱ्यांशी बोलून निर्णय घेणार आहे.'' 

अहमदनगर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com