esakal | सह्याद्रीच्या डोंगर रांगेत वसलेल्या ‘या’ गावात एक तास उशीरा सूर्य उगवतो
sakal

बोलून बातमी शोधा

The story of Fofsandi village in Akole taluka in the mountain range of Sahyadri

अतिदुर्गम गाव असलेल्या फोफसंडीत निसर्गाचा अविष्कार पाहायला मिळातो. घाट रास्ता.. सह्याद्रीच्या उंचच उंच डोंगर दऱ्यात लपलेले हे गाव... उंच डोंगरावरून फेसाळत येणारे विविध आकाराचे धबधबे.. तर भन्नाट वारा.. 

सह्याद्रीच्या डोंगर रांगेत वसलेल्या ‘या’ गावात एक तास उशीरा सूर्य उगवतो

sakal_logo
By
शांताराम काळे

अकोले (अहमदनगर) : अतिदुर्गम गाव असलेल्या फोफसंडीत निसर्गाचा अविष्कार पाहायला मिळातो. घाट रास्ता.. सह्याद्रीच्या उंचच उंच डोंगर दऱ्यात लपलेले हे गाव... उंच डोंगरावरून फेसाळत येणारे विविध आकाराचे धबधबे.. तर भन्नाट वारा.. वाऱ्याच्या वेगाने हवेत उडणारे धबधब्यातील पाणी व मध्येच धुक्याचे आगमनाने संपूर्ण परिसर आकाशमय... खोल दरीत असलेले ब्रिटिश अधिकारी फोफ साहेबांच्या नावाने परिचित असलेले हे फोफसंडी गाव! येथे सकाळी एक तास उशीरा सूर्य दिसतो. तर सायंकाळी एक तास लवकर डोंगराच्या आड तो लुप्त होतो.

हेही वाचा : विश्‍वास ठेवा! ‘हा’ दिल्लीचा लाल किल्ला नाही, तर नगर जिल्ह्यातील आहे हे गाव
१२०० लोकसंख्या, बारा वाड्या व बारा आडनावाचे लोक इथे राहतात. चार महिने पावसाळ्यात जे शेतीत उगवेल ते कमवून इतर आठ महिने रोजदारीसाठी पुणे व ठाणे जिल्ह्यात येथील नागरिक जातात. म्हातारी माणसे व लहान मुले घरी राहून आपले जित्राबं व घरे सांभाळतात. गावातील घरे जुन्या धाटणीचे विट माती, दगड रचून वरती कौले व पत्रे टाकून बनविलेले घरे एका शेजारी एक खेटून तर नव्याने घरकुलाचे मंजूर झालेले घरे सिमेंट वाळू व पत्रे टाकून उभारली आहेत. 
बोटावर मोजण्याइतकीच घरकुले मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. काही घरात गॅस आहे, तर बहुतांशी लोक चुलीवर स्वयंपाक करतात. 
गावात गिरण, जिल्हा परिषद शाळा, केंद्रीय आश्रमशाळा आहे. येथील दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून १५ विधार्थ्यांमध्ये लता काळू वळे या मुलीला ६९ टक्के मार्क मिळून ती विद्यालयात प्रथम आली आहे. तिचे डॉकटर होण्याचे स्वप्न आहे. शिवा वळे, भिवा वळे, पांडुरंग वळे, शिवाजी वळे, बुद्ध वळे, बुधा वळे, निवृत्ती वळे व महिला सुमन वळे, धोंडाबाई वळे हे गावात जाताना भेटले. गावातील प्रश्नाबाबत त्यांनी मन मोकळ्यापणाने गप्पा मारल्या. ७५ वर्षाचे भिवा पिलाजी वळे यांनी फोफ नावाचा ब्रिटिश अधिकारी दर रविवारी गावात यायचा त्यामुळे गावाला फोफसंडी नाव पडले, असे सांगितले. 

हेही वाचा : एका विहीरीमुळे बदलेले गावाचे नाव; नगर जिल्ह्यातील ‘हे’ गाव म्हणून आहे देशात प्रसिद्ध
तीन चार पिढ्यापासून आम्ही या गावात राहतो. गावात बारा वाड्या असून वळे, पिचड, कोंडार, भगत, पिचड, तातले, गोरे, उंबरे, गवारी, मेमाणे, भांगरे व भद्रिके अशी आडनावाची लोक इथे राहतात. आमचे गावात जनावरे पाळणे, पावसाळ्यात चार महिने भात, नागली, वरई पिके घेऊन इतर आठ महिने रोजंदारीसाठी पुणे जिल्ह्यातील कोपरे, मांडवे, ओतूर, बनकर फाटा येथे जावे लागते. 
शेतीला पाणी नसल्याने इतर पिके घेतात येत नाहीत. मांडवे नदीचा उगम दऱ्या आईच्या मंदिरापासून होतो. ही नदी आमच्या गावाला वेढा देऊन जाते. या नदीवर तळे बांधले तर आमच्या गावात भाजीपाला व शेती करता येईल. त्यातून आम्हाला रोजगार मिळेल. मात्र अनेक अर्ज विनंत्या करून अजून ते तळे बांधले नाही, असं नागरिक सांगत आहेत.
सरकारने ते बांधावे आम्ही तळ्याची देवासारखी वाट पाहतो. तर पंतप्रधान मोदी प्रत्येकाला घर देऊ म्हणतात, मात्र आमच्या गावात फक्त १० लोकांना घरे दिली. इतरांचे काय, असा सवालही वळे बाबानी विचारला. 

हेही वाचा : गावाला एकच 'वेस' असते असं आपल्याला माहितंय पण 'या' गावाला आहेत तब्बल तीस 'वेस'
निवृत्ती वळे व शिवाजी वळे यांनी गावात आठ दिवस वीज नाही व आली तर सिंगल फेज, थ्रीफेज नसल्याने पिण्याचे पाणी डोक्यावर आणावे लागते. रस्ते खराब झाले आहेत. कोरोनामुळे बस बंद आहे.  कोरोना काळात आम्ही मुंबई- पुणे येथील लोक गावच्या बाहेरच ठेवले. १४ दिवसानंतर त्यांना गावात प्रवेश दिला.

भिकूबाई वळे म्हणाल्या, कोरोना काय आम्हाला काय माहित? सूर्य तुम्हाकडे तसा आम्हाकडे  पावसाळ्यात धुके त्यामुळे सूर्य राजा उशिरा येतो नि लवकर जातो. पाऊस अधिक असल्याने पिके  वाहून जातात. आले तर रानडुक्कर खातात. त्यामुळे गाव अडचणीत आहे. वन खाते मदत करत नाही. गावात ७५ टक्के वनजमिनी असल्याने वनखाते जनावरे चारू देत नाही. होळी, गणपती, दिवाळी सणाला मजुरी मिळाली तरच सण साजरे होतात.

काळू वळे म्हणाले, ना आम्हाला प्यायला पाणी ना शेतीला पाणी. त्यामुळे मजुरीशिवाय पर्याय नाही. उन्हाळ्यात टँकर लागतो,  डांगी गायीचे दूध संकलन आजपासून सुरु झाले. २३ लिटर दूध अमृतसागरला पाठविले तर फोफसंडी, पळसुंदे १७ किलोमीटर. त्यात ग्रुप ग्रामपंचायत त्यामुळे गावाला विकास निधी नाही. रस्ते खराब झाले निसर्गसंपन्न असलेले हे गाव मात्र रोजगार नसल्याने अडचणीत सापडले आहे.

संपादन : अशोक मुरुमकर