दीडशे वर्षांपासून घुमतोय घंटेचा निनाद; ७५ वर्षापासून आजीवर जबाबदारी

विलास कुलकर्णी
Monday, 28 December 2020

बॅलेन्टाईन मेमोरियल चर्चमधील भव्य घंटेचा आवाज तब्बल दीडशे वर्षांपासून घुमतोय. शहराच्या वैभवाचे प्रतिक असलेली घंटा 75 वर्षांपासून एक आजीबाई नियमित वाजवतात.

राहुरी (अहमदनगर) : शहरातील बॅलेन्टाईन मेमोरियल चर्चमधील भव्य घंटेचा आवाज तब्बल दीडशे वर्षांपासून घुमतोय. शहराच्या वैभवाचे प्रतिक असलेली घंटा 75 वर्षांपासून एक आजीबाई नियमित वाजवतात.

एकेकाळी पाच किलोमीटर परिसरात स्पष्ट ऐकू येणारा घंटानाद, आता सिमेंटच्या जंगलात विरळ झाला. परंतु, आजही पंचधातूची ही घंटा इतिहासाची साक्षीदार अन्‌ राहुरीकरांच्या आकर्षणाची केंद्रबिंदू आहे. 

नगर जिल्ह्यातील बातम्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
यमुनाबाई मधुकर सगळगिळे (रा. राहुरी) या आजीबाई 75 वर्षांपासून नियमित चर्चची घंटा वाजवितात. त्या काळी घंटेचा निनाद थेट रेल्वेस्टेशनपर्यंत स्पष्ट ऐकू जायचा. आता सिमेंटच्या जंगलात इमारतीच्या भिंतीवर आदळून घंटानाद विरळ झाला' असे सांगताना हे काम कोणत्या साली सुरू केले, हे त्यांना नक्की आठवत नाही. आठवणी रमताना त्या म्हणाल्या, राहुरीत 19 नोव्हेंबर 1946 रोजी मुळा नदीला महापूर आला. या घटनेच्या सहा महिन्यांनंतर वयाच्या पंधराव्या वर्षी लग्न झालं. 

हेही वाचा : होणार पुन्हा सोन्याचा संसार; विधवा भावजयीसोबत दीर करणार लग्न, 7 जानेवारीचा मुहूर्त
त्या वेळी चर्चची झाडलोट, सफाई व घंटा वाजविण्याच्या कामासाठी 15 रुपये महिना वेतन मिळायचे. 

प्रत्येक रविवारी प्रार्थनेपूर्वी सकाळी दोन वेळा शक्‍य तितका वेळ घंटा वाजवते. इतर दिवशी ख्रिश्‍चन व्यक्तीचे निधन झाल्यावर त्यांच्या मृत्यूसमयी वयाच्या वर्षांएवढे टोल दिले जातात. चार मुलींची लग्न झाली. एका मुलाचे निधन झाले. सून एका नातवासह माहेरी राहते. एकाकी जगते. चर्चच्या कामातून अवघे 350 रुपये वेतन मिळते. चार घरची धुणीभांडी करून उपजीविका चालते, असे सांगताना यमुनाबाई यांचे डोळे भरून आले. 

असा झाला घंटेचा प्रवास 
ख्रिश्‍चन बांधवांना प्रार्थनेच्या वेळेची आठवण करून देण्यासाठी ब्रिटिशांनी 1863मध्ये एक भव्य घंटा आणली. इंग्लंडमध्ये 1856मध्ये तयार केलेल्या या घंटेचा प्रवास जहाजातून मुंबई, रेल्वेतून राहुरीपर्यंत झाला. घंटा बसविलेल्या ठिकाणी ख्रिश्‍चन बांधव प्रार्थनेसाठी जमत. शहरात पहिले रेव्हरंड वनीरामजी ओहोळ यांच्या अधिपत्याखाली प्रभू येशूची उपासना केली जात होती. त्यांच्या मागे रेव्हरंड डॉ. विल्यम बॅलेन्टाईन (1875-1922) यांनी धार्मिक कार्यासह शिक्षण, आरोग्य क्षेत्रात भरीव योगदान दिले. त्यांच्या कार्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ 1929मध्ये बांधलेल्या चर्चला त्यांचेच नाव देण्यात आले. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The story of Grandmother rings bells at the Ballantine Memorial Church in Rahuri