esakal | ओळखीच्या ठिकाणीच का जमवायचे लग्न; जाणून घ्या कारण
sakal

बोलून बातमी शोधा

Learn how to get married

प्राचीन मानवी समाज लहान- लहान समुहात वर्षानुवर्षे एकाच परिसरात राहत असल्यामुळे व कोणतेही सामाजिक बंधन नसल्यामुळे बाप- मुलगी, आई- मुलगा, बहिण- भाऊ असे शारीरिक संबंध येत होते.

ओळखीच्या ठिकाणीच का जमवायचे लग्न; जाणून घ्या कारण

sakal_logo
By
अशोक मुरुमकर

अहमदनगर : आपल्याकडे लग्न हा आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण असतो. वयात आल्याबरोबर लग्न जमवण्यासाठी घरात हालचाली सुरु होतात. मुलगा असेल तर मुलगी पाहण्यासाठी अन्‌ मुलगी असेल तर मुलगा पाहण्यासाठी नातेवाईकांना सांगितले जाते. जोडा कसा असेल, तो काय करतो, त्याचे शिक्षण किंती, शेती किती? असे एक ना अनेक प्रश्‍न यामध्ये विचारले जातात. त्याच्या घरची परस्थिती काय हेही पाहिले जाते. विवाह करताना रितीरिवाज आणि परंपरा पाहिल्या जातात. अशाच काही परंपरा खूप दिवसांपासून चालत आलेल्या आहेत. पण नेमक्या या परंपरा का आहेत.

विवाहाबद्दल मैत्रिय नवले यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवर म्हटलंय की, प्राचीन मानवी समाज लहान- लहान समुहात वर्षानुवर्षे एकाच परिसरात राहत असल्यामुळे व कोणतेही सामाजिक बंधन नसल्यामुळे बाप- मुलगी, आई- मुलगा, बहिण- भाऊ असे शारीरिक संबंध येत होते. (हा प्रकार सगळ्यांच्या बाबतीत होत नसतो. मानवी शरीरातून निघणारी संप्रेरके जवळच्या नात्यात शरीरसंबध होऊ देत नाहीत. ती किळस, घृणा निर्माण करतात. त्यात बिघाड झाल्यावरच तसा प्रकार घडतो) त्यातून विकृत, अनुवांशिक व्याधीनी ग्रस्त संतती निर्माण होत होती. त्याचा अभ्यास  कुलधर्माने केला व पहिला कायदा करण्यात आला. 

जगातील हा पहिला अधिकृत कायदा सांगतो की, एकाच कुलातील स्त्री- पुरूषांच्या शरिरसंबंधांवर बंदी टाकण्यात येत असून आता यापुढे शरीरसंबंध भिन्न कुलातील स्त्री- पुरूषात होतील. आजचे वंशशास्त्र सांगते की, अत्यंत जवळच्या रक्तसंबंधातील व्यक्तींच्या शरिरसंबंधातून निर्माण होणारी संतती ही मानसिक व शारीरिकदृष्ट्या कमजोर असते. हे शास्त्र आपल्याला हजारेक वर्षापूर्वीच्या कुलधर्माने केवळ सांगितले असे नाही. तर, कडक कायदा करून सांगितले.

आजही अनेक समाजात या मातृसत्ताक कुलधर्माचे नियम पाळतात. लग्नासाठी मुलगी शोधतांना पहिला प्रश्न विचारला जातो, मामाचं कुळ काय? मामाचं कुळ म्हणजे आईचं कूळ! वधूच्या मामाचे कूळ व वराचे कूळ जर सारखे असेल तर विवाह होत नाही, कारण ते दोघे बहिण- भाऊ ठरतात. त्यामुळे त्यांचे लग्न होऊ शकतच नाही. जर मुलीच्या मामाचं कूळ व वराचे कूळ भिन्न असेल तरच त्यांचा विवाह होऊ शकतो. 

पूर्वीच्या काळात असे शारीरिक संबंध होत असावेत व सामाजिकदृष्ट्या सुरूवातीला ती सामान्य बाब होती. याचे धागेदोरे आपल्याकडे पुराणकथांमधून मिळतात. उदा ब्रह्मदेवाने स्वतःच्या मुली सोबत लग्न करणे,  कालांतराने अशा प्रकारच्या संबंधांना समाजाने निषिद्ध मानले. परिणामी ब्रह्मदेवाची (पूर्वज) पूजा करणे बंद झाले... 
आपल्या सारखीच प्राचीन सभ्यता इजिप्शियन.. इजिप्तमधील पिरामिडमध्ये मिळालेल्या ममीच्या अभ्यासातून भाऊ-  बहिण लग्न झाल्याचे पुरावे मिळालेले आहेत. भारतात अनेक वर्षांपासून जवळच्या नात्यामध्ये लग्न करण्याची परंपरा आहे. धर्म आणि कायद्याचीही अशा लग्नाला मान्यता आहे. त्यात मामाची मुलगी- आत्याचा मुलगा यांच्यातील लग्नाचे प्रमाण खूप जास्त आहे. 

महाराष्ट्रात जवळपास २५ टक्के लग्न हे जवळच्या नात्यामध्ये होतात. जवळच्या नात्यात लग्न होतात. त्यात हिंदू धर्मात, मामाच्या मुलीशी, आत्याच्या मुलीशी, आणि बहिणीच्या मुलीशी आणि जवळच्या नात्यात लग्न करण्याची प्रथा खूप दिवसपासून चालत आलेली आहे. त्याचा परिणाम दिव्यांग मुल जन्माला येते. ते वरील कोणत्याही प्रकारचे असू शकते असे संशोधना अंती सिध्द झालेले आहे. मुस्लीम धर्मात, बहिणीच्या मुलीशी आणि आत्या आणि मामा या नाते संबंधात लग्न करण्याची प्रथा आहे. 

अनपेक्षित घडून आलेला प्रसंग यात भाऊ बहिण, बाबा- मुलगी, दीर- भावजय आणि बालवयात केलेला किंवा झालेला अतिप्रसंग यातून जर गर्भधारणा झाली तर दिव्यांग मुल जन्माला येण्याची शक्यता जास्त बळावते. जर मुलीचे किंवा प्रतिस्पर्ध्याचे वय कमी असेल तर नक्की होणारे मुल अपंग असू  येते. मात्र, जवळच्या नात्यात लग्न केलेल्या जोडप्यांना होणाऱ्या अपत्यात आनुवंशिक आजाराचे प्रमाण जास्त असते. इतर आरोग्यविषयक समस्या जास्त असू शकतात. 

एखाद्या व्यक्तीचे शरीर त्याच्या पेशीतील गुणसूत्रांवरच अवलंबून असते. मातापित्यांकडून मुलाला ही गुणसूत्रे मिळत असतात. त्यामुळेच मुलाचे डोळे आई वा वडिलांसारखे असतात. ते कोणासारखे तरी (आई, वडील, मामा, काका इ.) दिसते. हे होण्याचे कारण म्हणजे रक्ताचे नाते असणाऱ्या लोकांमधील गुणसूत्रात साम्य असते. हे साम्य ते एकाच वा सारखी गुणसूत्रे असणाऱ्या पूर्वजांचे वंशज असतात म्हणून असते. मेंडेलच्या अनुवंशिकतेच्या सिद्धांतानुसार प्रत्येक गुणधर्मासाठी, जसे हिरवे डोळे, गुणसूत्रांचा संच असतो. त्यात सर्वस्व गाजवणारे (Dominant) व दबावाला बळी पडणारे (recessive) असे दोन प्रकार असतात. दोन वर्चस्व गाजवणाऱ्या गुणसूत्रांची गाठ पडली, तर तिसराच गुण तयार होतो. 

एक वर्चस्व गाजवणारे व दुसरे दबावाला बळी पडणारे गुणसूत्र आले, तर वर्चस्व गाजवणाऱ्या गुणसूत्रांची सरशी होते व त्याप्रमाणे बालकात गुणात दिसून येतात. वेगवेगळ्या समाजातील लोक एक एकत्र आल्यास त्यांच्यात असणारी गुणसूत्रे विविध प्रकारची असतात. साहजिकच त्यांच्यातील वर्चस्व गाजवणाऱ्या गुणसूत्रांचाच संकर होऊन निरोगी समाज जन्माला येतो.

एकाच समाजात वारंवार लग्न होत गेल्याने त्या समाजातील दबावाला बळी पडणाऱ्या गुणसूत्रांचा संकर होऊन कमी प्रतीचे गुणधर्म मुलाबाळांत येतात. रक्ताचे नाते असलेल्या व्यक्तींनी परस्परांशी लग्न केले तर गुणसुत्रांमधील दबावाला बळी पडणाऱ्या गुणसूत्रांचे गुण मुलाबाळांत येतात. नात्यातील लग्‍नामुळे पुढील पिढीत येणारी काही व्यंगे. १) रातांधळेपणा २) डोळ्याची बुब्बुळे अस्थिर असणे ३) दुभंगलेले ओठ ४) मूकबधिरता ५) मानसिक आजार ६) मतिमंदता 7) पाठीतील कण्याचे आजार. या सर्व गोष्टींचा विचार केला. तर जवळच्या रक्‍ताच्या नात्यात लग्‍नसंबंध होऊ नयेत व त्यासाठी लग्‍नाचा अट्टाहास करू नये. 

आई- वडिलांनी त्याचा विचारसुद्धा करू नये व मुला- मुलींनी नातेसंबंधातील लग्‍नाच्या खोड्यात स्वत:ला अडकवून घेऊ नये, असे वाटते. जवळच्या नात्यांमधील विवाह, अनुवांशिक आजारांविषयी अज्ञान आणि आर्थिकपरिस्थितीमुळे आरोग्याकडे होत असलेल्या दुर्लक्षाने नव्या पिढीत अपंगत्वाचा टक्का वाढत असल्याची चिंताजनक माहिती उघडकीस आली आहे. 

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात स्थापन अपंग संमिश्र प्रादेशिक केंद्राच्या शीघ्र हस्तक्षेप युनिटने तीन महिन्यांत घेतलेल्या नोंदीतून हे वास्तव पुढे आले आहे. या केंद्राने गेल्या तीन महिन्यांत मेयोत जन्मलेल्या एकूण १२७ मुलांची निरीक्षणे नोंदविली. यात मुलींच्या तुलनेत मुलांमध्ये अपंगत्वाचे प्रमाण अधिक आहे. बहुतांश नवजात बालके ही शहरी भागातील असून त्यांच्यात अस्थिव्यंगाचे प्रमाण मोठे आहे.

नात्यामधील लग्नांना वैद्यकीय भाषेत ‘कॉनसॅनग्यूनस मॅरेज’ असे म्हणतात. त्यात तीन प्रकार आढळून येतात. फर्स्ट डिग्री: म्हणजे काका, मामा, पुतणी, मावसबहीण यांच्यातील विवाह, सेकंड डिग्री म्हणजे मावस किवा चुलत भाऊ बहिणीमधील विवाह व थर्ड डिग्री म्हणजे मामाची मुलगी व आत्याच्या मुलामधील विवाह. याशिवाय थेट रक्ताचे नाते असलेल्यांमध्ये विवाह झाल्यास तोही कॉनसॅनग्यूनस मॅरेजमध्ये येतो. 

नात्यातील लग्नामध्ये कोणत्या समस्या उद्भवू शकतात? प्रजननशक्तीवर परिणाम होऊ शकतो. गर्भपाताचे प्रमाण वाढू शकते. स्टील बर्थ (बाळाचे गर्भातील मृत्यूचे प्रमाण वाढू शकते)  नात्यामधील लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये काय समस्या येऊ शकते. अशा पालकांच्या मुलांमध्ये आनुवंशिक आजाराचे प्रमाण 25 टक्के असू शकते. त्यातच अ‍ॅटोझोनल रेसेसिव्ह आजारांचे प्रमाण जास्त असते. नात्यातील लग्नातून झालेल्या मुलांचा बुद्ध्यांक इतर मुलांपेक्षा कमी असल्याचे संशोधनात आढळून आले आहे. 
नात्यातील लग्नातून झालेल्या बाळांमध्ये आनुवंशिक आजारांचे प्रमाण जास्त का आढळून येते? 

याचा वैज्ञानिक आधार समजून घेणे गरजेचे आहे. जवळच्या नात्यातील वर- वधूमध्ये जवळपास २५ ते ५० टक्के जेनेटिक मटेरियल म्हणजे जनुकीय साहित्य सारखे असते. कोणतेही आजार प्रकट होण्यासाठी त्या आजाराचे दोन सदोष जनुक एकत्र येणे गरजेचे आहे.  हे सदोष जनुक एकत्र येऊन प्रकट होतात व अपत्यामध्ये हा आजार दिसून येतो; पण दोन वेगळ्या जनुकीय संबंध नसलेल्या कुटुंबातील व्यक्तीमध्ये असे होण्याची शक्यता नगण्य असते.

उदा. पारशी समाज अल्पसंख्य अन् कट्टर असल्याने समाजाबाहेर लग्न न करण्याबाबत आग्रही आहे. पारशी समाजाबाहेर लग्न करणाऱ्यांच्या मुलांना पारशी संस्थांकडून कोणत्याही सुविधा पुरविल्या जात नाही. मूठभर आकाराच्या या समाजातच लग्न करायचे तर अनेकदा रक्ताच्या नात्यात लग्न करण्याची वेळ येते. त्यामुळेच गुणसूत्रांद्वारे किंवा रक्ताद्वारे संक्रमित होणाऱ्या अनेक आजारांचे प्रमाण पारशी समाजात जास्त आहे.

अपस्मार, सेरिब्रल पाल्सी, फेब्राईल सिझर (लहान मुलांमध्ये), हालचालीतील असमर्थता अशा मज्जासंस्थेशी संबंधित विकारांपैकी एखादा तरी विकार प्रत्येक पारशी माणसात आढळतो. पार्किन्सन्सचे रुग्णही पारशी समाजात मोठया प्रमाणात आहेत. साठीच्या पुढे होणारा हा विकार पारशी समाजात ४० पेक्षाही कमी वयोगटातही दिसून येतो. मधुमेह, रक्ताचा व अन्य कर्करोग यांची शक्यताही पारशी माणसात मोठया प्रमाणात असते. तसेच उशीरा वयात मुले झाल्यास हार्मोन्समधील बिघाडांमुळे विकलांगतेचा धोकाही संभवतो. त्यामुळे पारशी समाजाची लोकसंख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. 

त्या जोडप्याने काय काळजी घ्यावी? ज्यांचे लग्न नात्यात झाले आहे. त्यांनी घाबरून जाऊ नये; पण आनुवंशिक आजार टाळण्यासाठी पुढील काळजी घ्यावी. गरोदर राहण्याचा निर्णय घेताना त्याआधी तीन महिने फोलिक अ‍ॅसिड, सप्लिमेंट्स घ्याव्यात.  जेनिटिक कौन्सिलर किंवा आपल्या स्त्रीरोग तज्ज्ञांना नात्यात लग्न झाल्याचे सांगून सल्ला घ्यावा. 14 ते 16 आठवड्यांनी ट्रिपल टेस्ट करून घ्यावी. 20 ते 22 आठवड्यांनी फोर डायमेन्शनल सोनोग्राफी (अ‍ॅनामोली स्कॅन) करून घ्यावी. 

गेल्या दशकात भारतात आनुवंशिक आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. या आजारांना कोणतेही उपचार नाहीत. ते टाळणे हाच एकमेव पर्याय आहे. कोणी कोणाशी लग्न करावे हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत व भावनिक मुद्दा असला तरी पुढील पिढ्यांचे नुकसान टाळलेले बरे! एके काळी लग्नासाठी मुलगा आणि मुलगी आपल्याच समाजातील असावेत असा आग्रह असायचा. या जगात जे- जे जुने आहे ते सर्व टाकाऊ आहे असे नाही आणि जे जे नवे आहे ते ते सारे चांगलेच असते असेही नाही. वेळोवेळी होणारे प्रयोग आणि येणारे अनुभव यातून चांगले किंवा वाईट ठरत असते.

मैत्रयी नवले यांच्या फेसबुकवरून साभार

loading image
go to top