esakal | १० मिनीटाच्या नियोजनातच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी फोडला होता तुरुंग
sakal

बोलून बातमी शोधा

The Story of Vasantdada Patil in the freedom struggle

स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या सेनानींनी सहभाग घेतला त्यापैकीच एक म्हणजे वसंतदादा पाटील! ब्रिटिशांच्या काळात त्यांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. यशवंतराव चव्हाण यांच्या काळात ते लढ्यात सक्रीय होते.

१० मिनीटाच्या नियोजनातच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी फोडला होता तुरुंग

sakal_logo
By
अशोक मुरुमकर

अहमदनगर : स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या सेनानींनी सहभाग घेतला त्यापैकीच एक म्हणजे वसंतदादा पाटील! ब्रिटिशांच्या काळात त्यांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. यशवंतराव चव्हाण यांच्या काळात ते लढ्यात सक्रीय होते. कृषी आणि सहकार क्षेत्रात त्यांनी अतुलनीय काम केले. ग्रामीण भागात काम करताना त्यांनी समाजाचा विश्‍वास संपादन केला. वसंतदादांचा जीवनकार्यकाल हा सामाजिक, राजकीय व आर्थिक परिवर्तनाचा काळ होता. 

अधिवेशनातील गांधीजींचे भाषण
७ ऑगस्ट 1942 ला मुंबईत काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन झाले. देशभक्तीने झपाटलेल्या स्वातंत्र्य सेनानींच्या साक्षीने मौलाना आझाद यांचे १०० मिनिटाचे भाषण यामध्ये झाले होते. दुसऱ्या दिवशी महात्मा गांधी यांचे भाषण झाले. ‘एक तर काँग्रेस स्वातंत्र्य मिळवीन नाही तर नष्ट होईल’, ‘करेंगे या मरेंगे’ असे म्हणत त्यांनी भाषणाचा समारोप केला. हात जोडून ते काही मिनीटे स्तब्ध उभा राहिले. त्यामुळे अनेकांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. त्या भाषणानंतर पंडित नेहरूंनी ‘छोडो भारत ठराव’ मांडला होता. स्वातंत्र्य लढ्याने आक्रमक आणि निर्णायक वळण घेतले आणि प्रत्येकजण पेटून उठला. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पद्ममाळे गावातील मळ्यातील छप्पर आंदोलनाचे केंद्र

येथून वसंतदादा आपल्या साथीदारांसह सांगलीला परतले. ‘पेटा व पेटवा’ हा मंत्र घेऊन त्यांनी आपल्या लढ्यास सुरुवात केली. येथील पद्माळे गावातील एका मळ्यातील छप्पर हे त्यांच्या आंदोलन लढ्याचे केंद्र बनले होते. तिथूनच क्रांतीच्या प्रत्येक पावल्याची दिशा ठरवली जायची. टेलिफोनच्या तारा तोडणे, रेल्वे गाडी रुळावरून घसरवणे,  चावड्या व पोलिसांवर हल्ले करणे यासाठी पैसा व शस्त्र जमवण्यासाठी इंग्रजांच्या मालमत्तेवर व सावकारांच्या घरांवर दरोडे टाकणे, अशी मोहीम त्यांनी राबवली. हे क्रांतिकारी युद्ध सुरू असतानाच पोलिसांनी सापळा रचून वसंतराव व त्यांच्या सहकाऱ्यांना अटक केली. सांगली संस्थानच्या तुरूंगात त्यांना ठेवण्यात आले होते.

सांकेतीक शब्दांचा वापर
स्वातंत्र्य संग्रामाच्या लढ्यात आपण तुरुंगात सडत राहणे त्यांना पटेना. काहीही करावे आणि तुरुंगाच्या बाहेर जाऊन क्रांती लढा लढत रहावा असे त्यांना सतत वाटत होते. त्यातूनच त्यांनी तुरुंगातून पळून जायचा विचार केला. तुरुंगाची रचना ही आव्हानात्मक व पळून जाण्याचा प्रयत्न केला तर जीवावर बेतली जाण्यासारखी होती. तुरुंगाच्या पश्चिमेला पोलिस ठाणे व पूर्वेला पोलिसांची निवासस्थाने होती. त्यातून बाहेर पहण्यासाठी त्यांनी तुरुंग फोडण्याचा त्यांनी चंग बांधला. तुरुंगातील इतर क्रांतिकारकांशी संवाद साधण्यासाठी त्यांनी सांकेतिक भाषा तयार केले. संवादातून तुरुंग फोडण्याचा आराखडा तयार केला गेला. तुरुंगाच्या तटावरील शस्त्रधारी पहारेकरी आणि तुरुंगात दिसणार्‍या इतर पोलिसांशी लढूनच त्यांना मोहिम यशस्वी करावी लागणार होती याची जाणीव दादा व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना झाली. 

हेही वाचा : मेंढपाळांचे पाल विद्युत रोषणाईने झळाळले; माजी सभापती झावरेंचा पालात मुक्काम
१० मिनीटात बाहेर पडायचे

जे काय करायचे ते अवघ्या १० मिनिटातच करायचे, असं त्यांनी ठरवले. आण्णासाहेब पत्रावळे व बाबुराव जाधव हे स्थानबंद असल्यामुळे ते तुरुंगात मुक्तपणे वावरू शकत होते. वसंतरावांना मात्र दिवसातून दोनवेळा शौचासाठी बंदोबस्तात बाहेर सोडले जायचे. पुन्हा त्यांना खोलीत बंद केले जायचे. पत्रावळे व जाधव तुरुंगात मोकळे असल्याने त्यांचा नेमका उपयोग करण्याचा त्यांनी निश्चय केला. संकेतिक भाषेमुळे त्यांचा इतरांशी सातत्याने संवाद सुरू राहिला. दुसरीकडे बेकायदेशीर शास्त्रसाठा करणे व इतर गुन्ह्याखाली वसंतरावांच्या विरोधात खटला सुरु होता. 

वसंतराव कसे गुन्हेगार आहेत हे सिद्ध करण्यासाठी पोलिसांनी अनेक पुरावे सादर केले होते. निकाल लागण्याचा दिवस ठरला. निकाल काय होईल याचा अंदाज त्यांना आला होता. पण त्याआधीच आपण बाहेर पडायचे असे. त्यांनी ठरवले. मात्र, त्यांना प्रत्यक्षात उतरायला संधीचे आवश्यकता होती. 

खटल्याचा निकाल जाहीर होणार होता तो दिवस शनिवारचा होता. शनिवार हा सांगलीचा आठवडी बाजाराचा दिवस. योगायोगाने वसंतरावांचे वकील पाटणकर यांचे सेशन कोर्टात विशेष काम निघाल्यामुळे निकालाची तारीख पुढे ढकलली. त्यामुळे शनिवारीऐवजी सोमवारी निकाल लागणार होता. वसंतरावांना मात्र निकाल माहिती होता. पुन्हा तुरुंगात येऊन कितपत पडण्याऐवजी बाहेर पडणे हाच पर्याय त्यांना योग्य वाटत होता. आठवडी बाजाराचा दिवस असल्याने तुरुंगातील काही कर्मचाऱ्यांना बाजाराची ओढ लागली होती. आदल्या दिवशी रात्री वसंतरावांनी आपल्या सहकाऱ्यांना नियोजन कळविले होते. तुरुंगातील स्वच्छालय आणि तिथून कसे पडायचे याचा आराखडा सर्वांच्या मनात पक्का झाला. 

ती संधी आलीच
हिंदुराव पाटील या सहकाऱ्याने आपल्या खोलीकडे जाताना आज पत्रावळेच्या लग्नाला जाऊ की सिनेमाला जाऊ असं संकेतिक निरोप सर्वांना पाठवला. रुमाल उंचावून सर्व सहकाऱ्यांना इशारा दिला. वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या सर्व क्रांतिकार यांनी त्या ठिकाणी आपल्याजवळ असलेल्या पोलिसांवर हल्ला चढविला. त्यांची शस्त्रे हिसकावून घेतली. दुपारी अडीच वाजता वसंतराव व हिंदुराव यांना स्वच्छतेसाठी त्यांच्या खोलीतून बाहेर आणले. परिस्थितीचा अंदाज घेऊन त्यांनी पहारेकऱ्यांवर हल्ला चढविला. त्याच्या हातातील बंदुक हिसकावून घेतली. वसंतरावांनी दुसऱ्या पहारेकऱ्यावर हल्ला केला. त्याच्या जवळील बंदूक घेऊन दुसऱ्या पाहारेकर्‍यावर हल्ला केला. 

संदर्भ : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ, मुंबई यांनी प्रकाशित केलेले ‘महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतदादा’ पुस्तक 

loading image