डोंगरदऱ्यात राहणाऱ्या ‘ती’ने वाघाशी संघर्ष करत हाकला संसाराचा गाडा

शांताराम काळे
Saturday, 14 November 2020

आपण बघतो छोट्या छोट्या संकटाना दररोज तोंड देणे व त्यातून स्वतःसह कुटुंबाला सावरणे ही बाब आदिवासी भागातील महिलांना नित्याचीच झाली आहे.

अकोले (अहमदनगर) : आपण बघतो छोट्या छोट्या संकटाना दररोज तोंड देणे व त्यातून स्वतःसह कुटुंबाला सावरणे ही बाब आदिवासी भागातील महिलांना नित्याचीच झाली आहे. डोंगरदऱ्यात राहणाऱ्या आदिवासी भागातील असंख्य रणरागिनी आपल्या कुटुंबाला अनेक समस्यातून बाहेर तर काढतातच, परंतु रोज जीवघेण्या प्रसंगांना तोंड देऊन आपल्या कुटुंबाची साथ करतात. आणि कुटुंबाला उभारी देतात. अशीच एक शूरवीर रणरागिणी म्हणजे फसाबाई आनंदा गोलवड!

नगर जिल्ह्यातील बातम्या वचण्यासाठी येथे क्लिक करा
कोंभाळणे आणि खिरविरेच्या सीमेवर दूर डोंगर- कपारीला बसलेल्या टेंभाडे वस्ती येथे आपले पती आनंदा सासू- सासरे आणि पाच लहान मुलींसह वास्तव्याला आहे. मूळचे सांगवी येथील असलेले हे कुटुंब भूमिहीन असल्याने शासनाने त्यांना कोंभाळणे येथील टेंभाडे वस्ती येथील माळरानावर सुमारे चार एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे. 

जीवन चरितार्थाचे शेती हेच मुख्य साधन असलेली हे कुटुंब आहे. अठराविश्व दारिद्र्य पाचवीला पूजलेल हे कुटुंब चालवायचे तर शेती सोडून दुसरा पर्याय नाही. मुलगा होईल या आशेवर कुटुंबात पाच मुलींना जन्म दिला गेला. बघता बघता परिवार मोठा झाला खाणारी तोंडे वाढली. परंतु परिस्थिती बेताचीच राहिली. कुटुंबावर जीवन चरितार्थ कसा चालवावा मोठे संकट घोंगावू लागले. कुटुंबाला सावरण्यासाठी व हातभार लावण्यासाठी शेळी पालन, कुकुटपालन छोट्या प्रमाणात करून बघण्याचा प्रयत्न केला. तो वाघांनी हाणून पाडला. अगदी बंदिस्त असलेल्या शेळ्या रात्रीतून वाघांनी फस्त केल्या. पती आनंदा कामाच्या शोधात घराबाहेर आणि घरापासून बराच काळ दूर राहत असताना म्हातारे सासू-सासरे घरात असताना कुटुंबाला आधार देण्याची मोठी जबाबदारी फसाबाईवरच असायची.

हेही वाचा : झेंडूची विक्री वाढल्याने भाव वधारला; अकोलेत फुलं घेण्यासाठी ग्राहक बांधावर 
घरात पाच चिमुरड्या संध्याकाळी अंधार पडला की, वाघाची भीती कधी कधी तर संध्याकाळी सातला वाघ हजर. त्यामुळे पाळीव प्राणी लहान मुली, म्हातारे सासू सासरे यांची सर्व जबाबदारी फसाबाईवर येऊन पडायची. संध्याकाळी घराचा दरवाजा उघडायची भीती. कारण या वेळेला वाघोबा कधी हजर होण्याची भीती. अशा परिस्थितीत फसाबाईने आपला परिवार मोठ्या शिताफीने जगवला आणि आजपर्यंत वाढवला आहे. रोज वाघाशी संघर्ष करून आपले कुटुंब शाबूत ठेवले आहे.

बायफ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेसोबत बचत गटांच्या माध्यमाने जोडले गेल्यानंतर तिने आपल्या शेतामध्ये कुटुंबाला हातभार मिळावा म्हणून थोड्याफार प्रमाणात भाजीपाला लागवड, परसबाग, भात, नागली, वरई, वटाणा, भुईमूग, चवळी, हरभरा, गहू असे पावसाच्या पाण्यावर येणारे पीक शास्त्रोक्त पद्धतीने लागवड केली. अतिशय कष्टाने तिने कुटुंबाला सावरले आहे. सोबतच वाघाच्या भीतीने आणि वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे शेळी पालन व्यवसाय कायमचा सोडून द्यावा लागला. 

सध्या तिने म्हैस पालन व्यवसाय सुरू करून तीन म्हशी सांभाळल्या आहेत. त्यांच्या दुधापासून खवा तयार करून त्यातून दोन पैसे कुटुंबासाठी उभे करत आहे. वर्षाकाठी चांगली दर्जेदार म्हैस तयार करून तिची विक्री करून चाळीस पन्नास हजार रुपये कुटुंबासाठी दरवर्षी उभे करत आहे. थोडाफार कुक्कुटपालनाचा व्यवसाय करून त्यातून कुटुंबाचे उदरभरण होईल याची खात्री करून घेत असते. अत्यंत कठीण परिस्थितीत आपल्या कुटुंबाला आधार देत तिने मोठ्या शिताफीने परिवार सावरला आहे. आपल्या मुलींना शिकवून मोठे करायचे हे तिचे स्वप्न आहे. 

मुलींमध्येच मुलाचे सुख अनुभवणारी फसाबाई अत्यंत कष्टाळू आणि प्रेमळ स्वभावाची आहे. आपल्या सासू-सासर्‍यांची सेवा करताना त्यांच्यात आई-वडिलांचे प्रेम ती अनुभवते. हे सर्व करत असताना कुटुंबाला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टींचे नियोजन तंतोतंत आणि अतिशय कसोशीने करत असते. गावापासून झाप दूर असल्याने विद्युत जोडणी अद्याप होऊ शकलेली नाही त्यामुळे रात्रीचा अंधार कधी संपेल व दिवस कधी उजडेल याकडे तिचे कायम लक्ष लागून राहते. 

रात्रभर वाघाची भीती आणि कुटुंबाची काळजी तिला झोप येऊ देत नाही . कित्येक वेळा वाघाशी संघर्ष करत तिने आपल्या कुटुंबाचे संरक्षण केलेले आहे.अशा परिस्थितीत दररोज रात्रीचा दिवस करत संघर्षमय जीवन तिला जगावे लागते. तिच्या या संघर्षमय व धाडसी वृत्तीला कर्तुत्वाला सलाम. खऱ्या अर्थाने आपल्या कुटुंबाला सावरणारी ही रणरागिनी नवदुर्गा चे रूपच म्हणावे लागेल. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Success story of Fasabai Ananda Golwada in Akole taluka