जामखेडमधील पाच ग्रामपंचायती बिनविरोधच्या बक्षिसास पात्र

वसंत सानप
Sunday, 3 January 2021

तालुक्‍यातील 49 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत विक्रमी 1 हजार 302 उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

जामखेड : तालुक्‍यातील 49 ग्रामपंचायतींसाठी दाखल झालेल्या 1 हजार 302 उमेदवारी अर्जांपैकी छाननीत 44 उमेदवारी अर्ज अपात्र ठरले आहेत. तर 1 हजार 258 उमेदवारी अर्ज पात्र ठरले आहेत.

निवडणुकीआधीच सारोळा, आपटी, खुरदैठण, पोतेवाडी व वाकी या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. आमदार रोहित पवार यांनी केलेल्या अवाहनानुसार या पाच ग्रामपंचायतींचा 30 लाखांच्या विकासनिधीवर दावा पक्का झाला आहे. उद्या (सोमवारी) अजून किती ग्रामपंचायती हा निधी मिळवितात, याकडे लक्ष लागले आहे. 

हेही वाचा - सोनईत पुन्हा पेटला गडाख विरूद्ध गडाख संंघर्ष

तालुक्‍यातील 49 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत विक्रमी 1 हजार 302 उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

शेवटच्या दिवशी उशिरापर्यंत ऑफलाईन अर्ज दाखल करण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिल्याने शेवटीच्या तब्बल 700 पेक्षा अधिक उमेदवारी अर्ज जामखेड तालुक्‍यातून दाखल झाले होते. यामुळे अर्जाची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करताना प्रशासनाला उशिर लागला.

ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रशासनाने एक जानेवारी रोजी सायंकाळी पात्र अपात्र उमेदवारांची यादी जाहीर केली. 44 अर्ज अपात्र ठरले, त्यामुळे 1 हजार 258 अर्ज पात्र आहेत. उद्या सोमवारी (ता. 4) माघार घेतली जाणार असून, नेमके किती उमेदवार रिंगणात राहतील, हे स्पष्ट होईल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unopposed election in five gram panchayats in Jamkhed