esakal | राहुरी कारागृहात होणार कैद्यांचे लसीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

राहुरी कारागृहात होणार कैद्यांचे लसीकरण

sakal_logo
By
पुरुषोत्तम कुलकर्णी

राहुरी (जि. नगर) : राहुरीच्या कारागृहातील न्यायालयीन व पोलिस कोठडीतील कैद्यांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण (Corona Vaccination) करण्यासाठी तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्याशी चर्चा करून, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दीपाली गायकवाड यांना लस उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. त्यामुळे राहुरीचे कारागृह लसीकरण करणारे राज्यातील पहिले कारागृह ठरणार आहे. (Vaccination-of-Prisoners-in-rahuri-jail-ahmednagar-marathi-news)

कैद्यांना लाभणार कोरोना संकटात सुरक्षा

प्रत्येक वर्षी सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद होणारा राहुरी तालुका जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. खून, दरोडे, चोऱ्या, भावकीचा वाद, हुंडाबळी, शेतकऱ्यांची बांधावरून भांडणे, पती-पत्नी वाद यांसारख्या प्रकारांमुळे न्यायालयीन व पोलिस कोठडीतील कैद्यांची संख्या मोठी आहे. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात व घटनास्थळी घेऊन जाणे व कारागृहात परत आणणे, या कामी पोलिस व नागरिकांशी आरोपींचा संपर्क होतो. त्यातून कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका असतो.
राहुरीच्या कारागृहात बंदिस्त असलेले बंदिवान अनेक स्त्री-पुरुष शेतकरी, व्यापारी व सामान्य कुटुंबातील असून, परिस्थितीमुळे गुन्हेगार झाले आहेत. प्रांताधिकारी डॉ. दयानंद जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण शिबिरामुळे कैद्यांना कोरोना संकटात सुरक्षा लाभणार आहे.

हेही वाचा: 'सहकार क्षेत्र बुडविणाऱ्यांना नव्या खात्यासंदर्भात भीती'

राहुरी कारागृहातील कैद्यांची संख्या

न्यायालयीन कोठडी : ३५ पुरुष, सहा महिला.
पोलिस कोठडी : सहा पुरुष, एक महिला.
एकूण कैदी : ४८.


''कैद्यांच्या जिवाला धोका होऊ नये, यासाठी माणुसकीच्या भावनेतून अनेकदा रॅपिड अँटिजेन चाचण्या केल्या. कोरोनाबाधित कैद्यांना उपचार देऊन कोरोनामुक्त केले. कैद्यांना लसीकरणाचा तहसीलदारांचा निर्णय स्तुत्य आहे.'' - नंदकुमार दुधाळ, पोलिस निरीक्षक, राहुरी

''राहुरीच्या कारागृहातील कैदी अनेकदा कोरोनाबाधित झाले. त्यांना नागरिकांप्रमाणे लसीकरणाच्या ठिकाणी नंबर लावून लस घेणे शक्य नाही. लसीकरणापासून कैदी वंचित राहू नयेत, यासाठी डोस उपलब्ध होताच शिबिर घेतले जाईल.'' - फसियोद्दीन शेख, तहसीलदार, राहुरी

(Vaccination-of-Prisoners-in-rahuri-jail-ahmednagar-marathi-news)

हेही वाचा: 'कोव्हॅक्सिन'चा आपत्कालीन वापराच्या यादीत लवकरच समावेश

loading image