संगमनेर : संगमनेरमधील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात प्रशासनाला यश आले असताना, संगमनेरमध्ये पुन्हा कोणत्याही मार्गाने कोरोनाचा शिरकाव होऊ नये, यासाठी प्रशासन दक्ष झाले आहे. संगमनेर पोलिसांनी आज येथून रेड झोन असलेल्या मुंबईकडे नाशिकमार्गे भाजीपाला वाहतूक करणारी वाहने दुपारी सायखिंडी फाट्यावर अडवली.
संगमनेर तालुक्यात आठ कोरोनाबाधित आढळल्यानंतर प्रशासनाने तातडीने योग्य ती दक्षता घेत हे प्रमाण शून्यावर आणण्यात लक्षणीय यश मिळविले आहे; मात्र पाथर्डी तालुक्यातून मुंबईला भाजीपाला वाहतूक करणारी एक व्यक्ती नुकतीच कोरोनाबाधित असल्याचे लक्षात आल्याने संगमनेरचे पोलिस पुन्हा सक्रिय झाले.
हेही वाचा - शेवग्याच्या शेंगामुळे शेतकऱ्याला कोरोना
राज्यातील मुंबई, पुणे या मोठ्या शहरांना संगमनेरातून मोठ्या प्रमाणात भाजीपाला निर्यात होतो. पाथर्डीप्रमाणे मुंबईतून भाजीपाला पोच करून येणारे चालक किंवा इतर व्यक्ती कोरोनाचा संसर्ग त्यांच्या सान्निध्यातील लोकांमध्ये पोचविण्याची शक्यता गृहीत धरून, संगमनेर पोलिसांनी आज हा निर्णय घेतला.
संगमनेरमधून या शहरांकडे छुप्या पद्धतीने पाठविले जाणारे गोवंशाचे मांस, भाजीपाला यांचे प्रमाण लक्षात घेता, सुरवातीपासून याकडे लक्ष देणे आवश्यक होते. रेड झोनमध्ये गेलेला चालक, मालक किंवा त्यांच्या वाहनातून अनधिकृतपणे आलेले प्रवासी धोकादायक ठरण्याची दाट शक्यता आहे. यामुळे अटोक्यात आलेला कोरोना प्रादुर्भाव पुन्हा वाढण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे.
अडविलेल्या वाहनचालकांना त्यांच्यामुळे होणाऱ्या धोक्याची कल्पना देत, मुंबईहून परतलेल्या वाहनातील व्यक्तींना सुरक्षिततेच्या कारणावरून 14 दिवस होम क्वारंटाईन करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
जाणून घ्या - कोरोना हटत नाही तोच जगापुढं नवं टेन्शन
पाथर्डीतील प्रकरणामुळे कोरोना प्रादुर्भावाची नवीन शक्यता पुढे आली आहे. मोठ्या शहरातील नागरिकांना भाजीपाला पुरवठा करताना आपला तालुका पुन्हा संकटाच्या उंबरठ्यावर उभा राहिल्याची जाणीव आता होत आहे.
जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच दिलेल्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी पोलिसांनी केली आहे. आजच्या कारवाईत वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक पप्पू कादरी, पोलिस निरीक्षक अभय परमार, सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोलिस उपनिरीक्षक संजय कवडे यांच्यासह वाहतूक व शहर पोलिसांच्या पथकाचा समावेश होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.