esakal | विखे-कर्डिले वादाचा धूर थांबला, आता तनपुरेची धुराडे पेटणार 
sakal

बोलून बातमी शोधा

The Vikhe-Kardi argument stopped

तनपुरे कारखान्याचे मार्गदर्शक खासदार डॉ. सुजय विखे पाटील व कर्डिले यांच्यात विधानसभा निवडणुकीनंतर नाराजीनाट्य रंगले होते. कर्डिले यांनी विखे पाटील यांच्याविरुद्ध थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रारींचा पाढा वाचला.

विखे-कर्डिले वादाचा धूर थांबला, आता तनपुरेची धुराडे पेटणार 

sakal_logo
By
विलास कुलकर्णी

राहुरी : डॉ. बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्यामुळे विखे-कर्डिले वादाचा धूर परिसरात पसरला होता. लोकसभा व विधानसभा निवडणुकांनंतर निर्माण झालेल्या बेकीची एकी झाली. त्यामुळे "तनपुरे'ची धुराडी पेटण्याचा मार्ग मोकळा झाला.

यंदा कारखाना कार्यक्षेत्रात भरपूर ऊस असल्याने, सहा लाख टन गाळप करून कारखान्याला आर्थिक चक्रव्यूहातून बाहेर काढण्याची संधी आहे. त्यादृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. 

मागील वर्षी ऊसटंचाईमुळे "तनपुरे'चा गाळप हंगाम बंद राहिला. त्यामुळे जिल्हा बॅंकेच्या कर्जाचा हप्ता थकला. बॅंकेने कारखान्याला नोटीस बजावली. बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर व संचालक, माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी संयुक्त पत्रकाद्वारे कारखान्यावर कारवाईचा इशारा दिला. त्यामुळे कारखाना व्यवस्थापनाचे धाबे दणाणले.

हेही वाचा - पारनेरचा तो कार्यक्रम ठरवून

तनपुरे कारखान्याचे मार्गदर्शक खासदार डॉ. सुजय विखे पाटील व कर्डिले यांच्यात विधानसभा निवडणुकीनंतर नाराजीनाट्य रंगले होते. कर्डिले यांनी विखे पाटील यांच्याविरुद्ध थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रारींचा पाढा वाचला. या घडामोडींमुळे कर्डिले "तनपुरे' कारखान्याला कोंडीत पकडतील, असे दिसत होते. 

बॅंकेची नोटीस मिळाल्यावर कारखान्याचे संचालक मंडळ, भाजप कार्यकर्ते, शेतकरी व कामगारांच्या शिष्टमंडळाने कर्डिले यांची भेट घेऊन त्यांना साकडे घातले. कर्डिले यांनी सकारात्मक भूमिकेचा शब्द दिला. नंतर राजकीय वादातील समज-गैरसमज बाजूला ठेवून खासदार डॉ. विखे पाटील यांनीही कारखान्याच्या संचालक मंडळासह कर्डिले यांची भेट घेतली.

दोन्ही नेत्यांमध्ये सुसंवाद घडविण्यासाठी कारखान्याचे संचालक रवींद्र म्हसे, भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. कर्डिले यांनी बॅंकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत कारखान्याची बाजू मांडली. कर्जाच्या परतफेडीसाठी एक वर्षाची मुदतवाढ मिळविली. 

सलग तीन वर्षे बंद पडलेला तनपुरे साखर कारखाना सुरू करण्यात तत्कालीन आमदार कर्डिले यांचा मोलाचा वाटा राहिला. त्यांनी बॅंकेच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यास मदत केली. या वेळीही वाद बाजूला ठेवून, कारखान्याचे सभासद, शेतकरी व कामगारहिताच्या दृष्टीने सकारात्मक भूमिका घेतली. त्यामुळे यंदा कारखाना सुरू होईल. 
- रवींद्र म्हसे, संचालक, तनपुरे साखर कारखाना