विखे पाटील म्हणतात, भारत बंदला विरोध करा

सतीश वैजापूरकर
Monday, 7 December 2020

शेतकऱ्यांनी आपल्या हितासाठी मोदी सरकारला पाठबळ द्यावे. रस्त्यावर उतरून "भारत बंद'ला विरोध करावा, असे आवाहन आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज केले.

शिर्डी ः केंद्र सरकार सत्तेत असताना, कृषी सुधारणांसाठी पूर्वीच्या कॉंग्रेसप्रणित सरकारने मॉडेल ऍक्‍ट आणला. त्यावेळी राज्यातील कॉंग्रेस आघाडी सरकारला त्यास पाठिंबा देण्यास सांगितले होते. आज हीच मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेल्या नव्या कृषी कायद्यास विरोध करीत आहेत. त्यांचा "भारत बंद' हा राजकीय फार्स आहे.

शेतकऱ्यांनी आपल्या हितासाठी मोदी सरकारला पाठबळ द्यावे. रस्त्यावर उतरून "भारत बंद'ला विरोध करावा, असे आवाहन आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज केले.

नूतन नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी आज पदभार स्वीकारला. भाजपचे जिल्हाध्यक्ष (उत्तर) राजेंद्र गोंदकर, मावळत्या नगराध्यक्ष अर्चना कोते, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभूवन, अभय शेळके, माजी नगराध्यक्ष कैलास कोते, ज्ञानेश्वर गोंदकर आदी उपस्थित होते. 

विखे पाटील म्हणाले, की सुधारित कृषि कायद्याला विरोध, म्हणजे शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेणे होय. शेतमाल कुठेही विकण्याचे स्वातंत्र्य शेतकऱ्यांना आता मिळाले आहे. या नव्या कायद्यामुळे शेतकरी आत्मनिर्भरतेने पुढे जाणार आहे.

नूतन नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर म्हणाले, की भाजप, शिवसेना व मनसेच्या सदस्यांनी पाठबळ दिल्याने नगराध्यक्षपदाची संधी मिळाली. आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारभार करणार आहोत. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vikhe Patil says oppose the Bharat Bandh