पुणतांबे ग्रामपंचायतीचा साठवण तलाव कोरडा; पर्यायी योजनेतून तहान भागवण्याची तयारी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 11 December 2020

ग्रामपंचायत साठवण तलावातील पाणी आठ दिवसापूर्वी संपले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने गोदावरी नदीकाठावरील पर्यायी पाणी योजनेच्या विहिरीतील पाणी ग्रामसस्थांना दिले आहे.

पुणतांबे (अहमदनगर) : येथील ग्रामपंचायत साठवण तलाव कोरडा पडला आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून गोदाकाठावर असलेल्या विहिरीचे पाणी ग्रामस्थांना दिले जात आहे. हे पाणी पिण्यास फारसे चांगले नाही. पाटबंधारे खात्याने गोदावरी कालव्याला लवकरात लवकर पिण्याच्या पाण्याचे अर्वतन सोडावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

अहमदनगरच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 
 
येथील पाणी योजना गोदावरी कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहे. ग्रामपंचायत साठवण तलावातील पाणी आठ दिवसापूर्वी संपले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने गोदावरी नदीकाठावरील पर्यायी पाणी योजनेच्या विहिरीतील पाणी ग्रामसस्थांना दिले आहे. परंतु या विहिरीत कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-यांचे पाणी जात असल्याने पाणी पिण्यास फारसे चांगले लागत नाही.

गेल्या 30 आक्टोबर रोजी पाटबंधारे खात्याने कालव्याच्या पाण्याने येथील पाणी पुरवठा साठवण तलाव भरुन दिला होता. परंतु वाढती लोकसंख्या व तलावात गाळ साठल्याने पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे 30 दिवसातच तलाव कोरडा झाला आहे. कालव्याला पाणी कधी येईल, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

ग्रामपंचायत साठवण तलाव भरुन देऊन महिनाच उलटला आहे. दोन महिने साठवण तलावातील पाणी पुरविण्यात यावे, असे ग्रामपंचायत प्रशासनाला कळविले होते. १५ डिसेंबरनंतर गोदावरी कालवा पाणी आर्वतन सुरु होण्याचे संकेत आहेत. 
- महेश गायकवाड, पाटबंधारे अभियंता- राहाता तालुका

संपादन - सुस्मिता वडतिले  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Villagers have demanded that the Irrigation Department should release drinking water to Godavari canal as soon as possible