esakal | जायकवाडीचा पाणीसाठा ४३ टक्क्यांवर; यंदा धरण भरण्याची शक्यता कमीच
sakal

बोलून बातमी शोधा

Jayakwadi Dam

जायकवाडीचा पाणीसाठा ४३ टक्क्यांवर; यंदा धरण भरण्याची शक्यता कमीच

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

शेवगाव (जि. नगर) : पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस न झाल्याने जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) पाण्याची आवक मंदावली आहे. धरणातील पाणीसाठा ४३.६६ टक्क्यांवर पोचला आहे. पावसाळ्याचे उर्वरित दिवस लक्षात घेता, पाण्याची आवक न वाढल्यास धरण यंदा शंभर टक्के भरण्याची शक्यता कमीच आहे. पाथर्डी व शेवगाव तालुक्यांत दोन दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे नद्यांना आलेल्या पुरामुळे जायकवाडी धरणसाठ्यात १.०७ टक्क्याने वाढ झाली आहे.


जायकवाडी धरणाच्या पाण्यावर तालुक्याच्या उत्तर भागातील शेतीसह शेवगाव-पाथर्डी व ५६ गावे, शहरटाकळी व १८ गावे, तसेच हातगाव व २२ गावे, अशा महत्त्वाच्या पाणीयोजना अवलंबून आहेत. त्यामुळे जायकवाडी धरणातील पाणीसाठ्याकडे मराठवाड्यासह शेवगाव, पाथर्डी व नेवासे तालुक्यांचे लक्ष लागून असते. यंदा तालुक्यात व धरणाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस नसल्याने पाण्याची आवक कमी होत आहे. मुळा, भंडारदरा, निळवंडे, गंगापूर, दारणा यांसह मोठे अनेक प्रकल्प अद्याप शंभर टक्के भरलेले नाहीत. त्यामुळे सध्या अवघी तीन हजार १६५ क्यूसेक पाण्याची आवक सुरू आहे. धरणात आज (गुरुवारी) पाणीपातळी एक हजार ५०९.९० फूट व ४६०.०२६ मीटर असून, एकूण पाणीसाठा एक हजार ६८६.१३२ दशलक्ष घनमीटर व जिवंत पाणीसाठा ९४८.०२६ दशलक्ष घनमीटर इतका आहे. सध्या धरणात ४३.६६ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या दोन दिवसांत शेवगाव व पाथर्डी तालुक्यांत झालेल्या दमदार पावसामुळे जायकवाडी जलाशयाच्या पाणीपातळीत १.०७ टक्क्याने वाढ झाली आहे.

हेही वाचा: पक्ष्यांनी सोडली अर्धवट घरटी अन् वाळू लागले वृक्ष


जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी असल्याने, धरणात येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली आहे. शेवगाव-पाथर्डी तालुक्यांत झालेल्या पावसामुळे दोन दिवसांत टक्केवारी वाढली. मात्र, सप्टेंबरअखेरपर्यंत धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्यास हे धरण भरू शकते.
- प्रशांत जाधव, कार्यकारी अभियंता, जायकवाडी धरण, पैठण

हेही वाचा: संगमनेर : सायखिंडी शिवारात खासगी बस उलटली

loading image
go to top