नेवशातील नव्या तहसील कार्यालयाचा 'वास्तू प्रवेश' मुहूर्त निघेना

सुनील गर्जे
Wednesday, 23 December 2020

तहसील कार्यालयाच्या नव्या मुख्य इमारतीचे बांधकाम पूर्ण होवून रंगकामही झाले.

नेवासे (अहमदनगर) : तहसील कार्यालयाच्या नव्या मुख्य इमारतीचे बांधकाम पूर्ण होवून रंगकामही झाले. मात्र ठेकेदाराचे दुर्लक्ष व उर्वरित कामांसाठी लागणाऱ्या चार कोटी ५३ लाखांचा भाजप सरकारच्या काळात 'लाल फितीत' अडकलेला नवीन प्रस्तावास नुकतीच महाविकास आघाडी सरकारने मंजूरी मिळाल्याचे माहिती संबंधित विभागाकडून मिळाली.

मात्र सार्वजनिक बांधकाम व महसुल विभाग यांच्यात फक्त 'फर्निचर' व इतर अंतर्गत सुविधाच्या मुद्द्यावर हस्तांतर राखडल्याने या नव्या तहसील कार्यालयाच्या 'वास्तू प्रवेशा'चा' मुहूर्त निघत निघेना.

नेवासे तहसील कार्यालयाची सध्याची इमारत १९१८ मध्ये इंग्रजकाळात उभारण्यात आलेल्या या कौलारू इमारतीने २०१८ मध्ये शंभरी गाठल्याने तिची दुरावस्था झाली आहे. पावसाळ्यात होणाऱ्या पाणी गळतीमुळे संगणक, कागदपत्रे पानकापडाने झाकून घ्यावी लागत. यावर्षी छतावर पानकपड टाकले आहे. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
नेवासे तहसीलच्या नव्या इमारतीचे कामास २०११ मध्ये मंजूरी मिळाली असून २०१६ पर्येंत हे काम पूर्णा करण्याची मुदत संबंधित बांधकाम कंपनीची होती. मात्र ठेकेदाराचे दुर्लक्ष, उशिरा मिळणारा निधी यामुळे हे काम रखडले आहे.
यासाठी नवा प्रस्ताव फर्निचर, संरक्षण भिंती, अंतर्गत रस्ते, बगीचा, पिव्हिंग ब्लॉक यासाठी २०१८-१९ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने चार कोटी ५४ लाखाचा नवा प्रस्ताव शासनास पाठविला होता तो नुकताच मंजूर झाल्याने लवकरच निधी उपलब्ध होऊन रखडलेले काम मार्गी लागणार आहे.

पार्किंगची व्यवस्था व्हावी
नेवासे तहसील आवारातच तालुका पोलिस ठाणे, कारागृह, दुय्यम निबंधक, कोषागार ही शासकीय कार्यालये असल्याने याठिकाणी नेहमीच नागरिकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे याठिकाणी पार्किंगची मोठी सुविधा उपलब्ध व्हावी अशी अपेक्षा नागरिकांत आहे.

रखडलेला प्रस्तावास मंजुरी दिल्याने महाविकास आघाडी सरकारच्या अभिनंदन. सध्याचे तहसील कार्यालयाची जागा वाढत्या लोकसंख्येमुळे कमी पडत आहे. नव्या इमारतीचे काम गतीने व्हावे, असे नंदकुमार पाटील (उपनगराध्यक्ष, नेवासे) यांनी सांगितले. 

इमारतीचे काम मुदतीत पूर्ण झाले आहे. मुळ आराखड्यात फर्निचरसह इतर कामांचा समावेश नव्हता. मात्र त्याच मुद्द्यावर हस्तांतर रखडले आहे, असे रमेश खामकर (शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम, नेवासे) म्हणाले.

फर्निचरसह उर्वरित कामे बाकी आहे. लवकर कामे पूर्णा व्हावे यासाठी संबंधित विभाग व बांधकाम कंपनीकडे पाठपुरावा चालू आहे.  कामे पूर्ण झाल्यावरच इमारतीचे हस्तांतर होणार, असे रुपेशकुमार सुराणा (तहसीलदार, नेवासे) यांनी सांगितली.

नवी तहसील इमारत दृष्टिक्षेपात...
*मंजूरी : 2011. *मिळाला निधी : 2.25 कोटी. *कामास प्रारंभ : 2014. *खर्चीत निधी : 2.4 कोटी. *कामाची मुदत : 2016 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When will the new tehsil office in Nevasa be inaugurated