आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून ‘मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन’

नीलेश दिवटे 
Tuesday, 8 September 2020

आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून 'स्वस्थ कन्या- उज्वल भविष्य' अभियानांतर्गत महिला शिक्षकांसाठी कर्जत येथे 'मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन' प्रशिक्षण झाले.

कर्जत (अहमदनगर) : आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून 'स्वस्थ कन्या- उज्वल भविष्य' अभियानांतर्गत महिला शिक्षकांसाठी कर्जत येथे 'मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापन' प्रशिक्षण झाले.

कर्जत तालुक्यातील ८२ गावातील १२० शाळेतील ११० शिक्षिकांनी या शिबिरात सहभाग नोंदवला आहे. शिबिरासाठी मार्गदर्शक म्हणुन लाभलेले अॅड. प्रवीण निकम व कौस्तुभ जोगळेकर यांनी महिलांच्या मासिक पाळीविषयी समाजातील असणारे समज- गैरसमज, मासिक पाळी व त्या काळातील स्वच्छता कशी ठेवायची? याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले. 

हेही वाचा : पुण्यातील विद्यार्थी सहाय्य समितीच्या वतीने नगर जिल्ह्यात वृक्षारोपणाचा प्रारंभ
कार्यशाळेमध्ये उपस्थित असलेल्या महिला शिक्षकांनी वर्गात मुलींचे प्रबोधन कसे करावे? याबाबतही मार्गदर्शन केले. आमदार रोहित पवार व बारामती ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांच्या पुढाकाराने कर्जत- जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून कर्जत- जामखेड मतदारसंघात महिला सक्षमीकरणाबाबत विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत.

विशेषतः सुनंदा पवार या महिलांच्या प्रश्नाबाबत अधिक सक्रिय आहेत. त्यांनी मतदारसंघात फिरून दिड लाखाहून अधिक मुलींशी आपुलकीचा संवाद साधला आहे. मुलींच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या आरोग्यावरही पालक बनुन कायम लक्ष ठेवले आहे.मासिक पाळी, सॅनिटरी पॅडचे महत्त्व, शिक्षण, करियर, लग्न, प्रेम प्रकरण, अल्पवयीन माता आदी विषयांवर मुलींशी थेट संवाद साधून त्यांना चांगल्या- वाईटबाबीं विषयी मार्गदर्शन करून निर्भीडपणे बोलण्यास भाग पाडले आहे.

हेही वाचा : घंटागाडीची उंची वाढली; कचरा टाकण्यासाठी महिलांना शोधला ‘असा’ पर्याय
आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या शिबीरामुळे विद्यार्थिनी व महिला शिक्षिका मासिक पाळी तसेच महिला आरोग्यविषयक प्रश्नांबाबत मुक्तसंवाद साधतील. आरोग्याविषयी असलेले समज- गैरसमज दूर झाल्यामुळे मुलींचे भविष्यात होणारे नुकसान टाळले जाईल. असे मत बारामती ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी व्यक्त केले.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Workshop for women on behalf of MLA Rohit Pawar in Karjat Jamkhed taluka