
राहुरी तालुक्यात गोळीबारात तरुण ठार
राहुरी : गुंजाळे (ता. राहुरी) येथे आज (सोमवारी) सकाळी नऊ वाजता भर चौकातील टेलरच्या दुकानात गावठी पिस्तुलातून गोळीबार झाला. या घटनेत एका अविवाहित तरुणाच्या छातीत गोळी घुसली. ग्रामस्थांनी व कुटुंबीयांनी दुकानात धाव घेत, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला तत्काळ नगर येथे खासगी दवाखान्यात हलविले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
हेही वाचा: नवाब मलिकांच्या अडचणी वाढणार? SC आयोगानं दिले 'हे' आदेश
प्रदीप एकनाथ पागिरे (वय २५, रा. गुंजाळे) असे मृताचे नाव आहे. तो टेलरिंग व्यवसाय करीत होता. या घटनेने तालुक्यात गावठी पिस्तुलांचा सुळसुळाट झाल्याचे अधोरेखित झाले आहे. घटनेची माहिती समजताच पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली.मिटके यांनी सांगितले, की आज सकाळी नऊ वाजता प्रदीप दुकानात एकटाच होता. त्याची आई व अक्षय नवले (रा. गुंजाळे) नावाचा एक मित्र दुकानाबाहेर बोलत होते. एवढ्यात दुकानातून गोळीबाराचा आवाज आला. सर्व जण तिकडे धावले. प्रदीप रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. मित्र अक्षयने त्याला नगर येथे खासगी रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारापूर्वी त्याचे निधन झाले.
हेही वाचा: Budget 2022 : पेगॅसिसवर स्वतंत्र चर्चेला वावच नाही - Govt
प्रदीप पागिरे याने गावठी पिस्तुलातून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. त्यामुळे, सुरवातीला राहुरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मृताच्या उत्तरीय तपासणी अहवालात व पोलिस तपासात प्रदीपनेआत्महत्या केली की त्याचा खून झाला, याविषयी स्पष्ट होईल. त्यानुसार गुन्ह्यातील कलमे वाढविली जातील. घटनेत वापरलेले गावठी पिस्तूल कोणाचे आहे, ते कोणाकडून खरेदी केले, कोणत्या उद्देशाने खरेदी केले, आत्महत्या असल्यास नेमके कारण कोणते, याविषयी सविस्तर तपास केला जाईल, असे मिटके यांनी सांगितले.
Web Title: Young Man Killed Firing Rahuri Taluka
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..