रविवारची सुटी झाली 130 वर्षांची; रविवारीच सुटी का असते?, यामागचे कारण तुम्हाला माहीत आहे का?...वाचा

सागर कुटे
Wednesday, 10 June 2020

रविवारच्या सुटीचा इतिहास मोठा रंजक आहे. आपल्या देशात पूर्वी अशा सुट्या नव्हत्या. पण शनिवारी तेल आणू नये किंवा सोमवारी कटिंग करू नये असे मानले जायचे.

अकोला : शासकीय असो अथवा खासगी प्रत्येक कामाच्या ठिकाणी रविवारचा दिवस सुटीचा दिवस असतो. मात्र, रविवारीच सुटी असण्यामागचे कारण तुम्हाला माहीत आहे का? रविवार हा सार्वजनिक सुटीचा दिवस म्हणून का घोषित करण्यात आला याचे कारण तुम्हाला माहीत आहे का? ही सुटी एका मराठी माणसाने तब्बल आठ वर्षे संघर्ष करून मिळवली आहे. विशेष म्हणजे आज त्या ‘रविवारच्या सुटी’चा वाढदिवस आहे.

रविवारच्या सुटीचा इतिहास मोठा रंजक आहे. आपल्या देशात पूर्वी अशा सुट्या नव्हत्या. पण शनिवारी तेल आणू नये किंवा सोमवारी कटिंग करू नये असे मानले जायचे. या मान्यतेनुसार संबंधितांचा आठवडी सुटीचा दिवस ठरायचा. औद्योगिक क्रांतीनंतर नोकरी नावाचे प्रकरण आले आणि मग साप्ताहिक सुटीची गरज वाटू लागली. ब्रिटिशांच्या काळात कामगारांना सातही दिवस काम करावे लागत असे त्यांना सुट्टी मिळत नसे. त्याकाळी ब्रिटिश अधिकारी रविवारी चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी जात असत.

महत्त्वाची बातमी - अहो आश्‍चर्यम! लोकमान्य टिळकांच्या आधीपासूनच या गावात साजरा होतो सार्वजनिक गणेशोत्सव

मात्र कामगारांसाठी अशी काही परंपरा नव्हती. त्यावेळी नारायण मेघाजी लोखंडे हे कामगार नेते होते. बॉम्बे टेक्सटाइल मिलमध्ये काम करताना नारायण मेघाजी लोखंडे यांनी गिरणी कामगारांना भेडसावणारे प्रश्न आपल्या साप्ताहिकात मांडण्यास सुरुवात केली. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मदतीनं त्यांनी देशातील पहिली कामगार संघटना बांधली. त्यातून कामगारांच्या अनेक समस्या सुटल्या. 1881 साली त्यांनी कापड गिरण्यांतील कामगारांना रविवारी सुट्टी मिळावी, अशी मागणी करणारा इंग्रजांसमोर अर्ज केला. 

हेही वाचा - काय म्हणता ! जगप्रसिद्ध लोणार सरोवरच्या पाण्याचा रंग लाल? नेमके काय झाले? वाचा...

या प्रस्तावात त्यांनी असे नमूद केले की, आम्ही स्वत:साठी आणि कुटुंबासाठी सहा दिवस काम करतो. त्यामुळे आठवड्याच्या शेवटी एक दिवस आम्हाला देशाची सेवा करण्यासाठी तसेच काही सामाजिक कामे करण्यासाठी मिळावा यासाठी रविवारी साप्ताहिक सुट्टी मिळावी. मात्र, ब्रिटिश सरकारनं क्षणाचाही विलंब न करता तो अर्ज फेटाळून लावला. त्यानंतरही लोखंडे यांचे प्रयत्न कायम होते.

कामगारांना आठवड्यातून एक दिवस सुट्टी असायलाच हवी या मागणीवर नारायण मेघाजी लोखंडे ठाम होते. पण इंग्रजांकडून त्यांची ही मागणी सहजासहजी मान्य होणार नव्हतीच. त्यामुळं त्यांनी रविवारच्या सुट्टीसाठी चळवळ सुरू केली. 1881 साली सुरू झालेली ही चळवळ 1889 पर्यंत चालली. अखेर 10 जून 1890 रोजी रविवारची पहिली सुट्टी भारतीयांना मिळाली. कामगारांसाठी केलेल्या या कार्यामुळं नारायण मेघाजी लोखंडे हे भारतीय कामगार चळवळीचे जनक ठरले. ही सुट्टी एका मराठी माणसाने तब्बल आठ वर्षे संघर्ष करून मिळवली.

‘हॉली डे’
भारतात तेव्हा ब्रिटिशांचे राज्य असल्याने ख्रिश्चनधर्मीय ब्रिटिशांनी भारतात रविवार हा दिवस साप्ताहिक सुटीचा जाहीर केला. चर्चमधील प्रार्थनांसाठी त्याचा उपयोग व्हायचा. मात्र तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये साप्ताहिक सुटीबाबत दोन मतप्रवाह होते. ख्रिश्चन धर्माप्रमाणे रविवारी साप्ताहिक सुटी द्यावी, असे एका गटाचे म्हणणे होते तर भारताचे बहुधर्मीय-बहुसांस्कृतिक स्वरूप लक्षात घ्यावे, अशी भूमिका दुसऱ्या गटाची होती. ब्रिटिश साम्राज्यापूर्वी मोगल राजवटीत शुक्रवारी साप्ताहिक सुटी राहायची. अनेक धर्मांमध्ये एखादा विशिष्ट दिवस पवित्र मानला जातो. त्याला इंग्रजीत ‘होली डे’ असे म्हटले जाते. या ‘होली डे’वरूनच पुढे ‘हॉली डे’ हा शब्द रुढ झाल्याचे मानले जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: narayan lokhande gives sunday holiday in india, today's his birthday