तुमच्या येथेही मुद्रांकाची जादा भावाने विक्री होते का?...मग आवश्‍यक वाचा

Stamp paper seller in buldana district.jpg
Stamp paper seller in buldana district.jpg
Updated on

चिखली (जि.बुलडाणा) : शासकीय मुद्रांकाची कृत्रिमरित्या टंचाई निर्माण करीत वाढीव भावाने विक्री करणे मुद्रांक विक्रेत्याच्या अंगलट आले असून त्याचेविरुध्द चिखली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे चढ्या भावाने मुद्रांक विक्री करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ निर्माण झाली आहे.

याबाबत सविस्तर असे की, संपूर्ण देशात कोरोना आजाराने थैमान घातल्यामुळे अगोदरच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या समस्येत अधिकच वाढ झालेली आहे. अशातच आपल्या विविध कामांकरिता तहसील कार्यालयीन व इतर कामाकरिता स्टॅम्प खरेदी करण्याकरिता आलेल्या शेतकऱ्यांकडून अधिक पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी तहसील प्रशासनाकडे आल्या होत्या. याबाबत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी याबाबत दुय्यम निबंधकांकडे ता.28 मे रोजी तक्रार दिली होती तसेच याबाबत तहसील प्रशासनाला माहिती दिली होती हे विशेष. 

याबाबत नायब तहसीलदार निकेतन वाळे (35) यांनी स्वत: शहानिशा करीत चिखली पोलिस स्टेशनला लेखी तक्रार दाखल केली की, मुद्रांक विक्रेते शैलेश श्रीकृष्ण कोठाळे हे त्यांच्या जुन्या तहसील कार्यालयाजवळील कोठाळे झेरॉक्‍स या दुकानवर 100 रुपये किमतीचे शासकीय मुद्रांक 150 रुपये दराने विक्री करत असल्याची तक्रार प्राप्त झाल्या होत्या. त्या तक्रारीची शाहनिशा करून कारवाई करण्यासाठी ता.2 जून रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास नायब तहसीलदार निकेतन वाळे यांच्यासह मंडळ अधिकारी किशोर पाटील, तलाठी भगवान पवार, यांच्यासह पंच सचिन भुतेकर व भागवत मंडळकर हे कोठाळे झेरॉक्‍सवर गेले असता त्यांना मुद्रांक विक्रेता परवाना क्रमांक 1/99 शैलेश श्रीकृष्ण कोठाळे हे जादा भावाने मुद्रांकाची विक्री करताना आढळून आले. 

त्याबाबत पंचासमक्ष पंचनामा करून सदर विक्रेत्याचे स्टॉक रजिस्टर , विक्री रजिस्टर, 100 रुपये दराचे एकूण 408 मुद्रांक पेपर किंमत रुपये 40,800 जप्त करण्यात आले तसेच तिथे मुद्रांक खरेदी करण्यासाठी जमा असलेल्या ग्राहकांचे जबाब नोंदविण्यात आले. त्यामुळे मुद्रांक विक्रेता शैलेश कोठाळे यांनी आपल्या दुकानावर शासकीय मुद्रांकाची साठवणूक करून स्वतः:चे आर्थिक फायद्यासाठी मुद्रांकाची कृत्रिमरीत्या टंचाई निर्माण करून जनतेकडून मुद्रांकाकरिता शासकीय दरापेक्षा जादा रक्कम घेऊन जनतेची व शासनाची फसवणूक केली आहे अशा आशयाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. सदर तक्रारीवरून चिखली पोलिस स्टेशनला ता.2 जूनच्या रात्री उशिरा भारतीय दंड संहिता 1860 कलम 420 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक किरण खाडे करीत आहेत.

असा प्रकार समोर आल्यास कडक कारवाई
जादा दराने शासकीय मुद्रांकाची विक्री करीत असल्याच्या माहितीवरून याबाबत अधिक माहिती घेत दुय्यम निबंधकांना कळविण्यात आले आहे. मुद्रांक विक्रेत्यांची बैठक घेऊन त्यांना योग्य त्या सूचना देत आजरोजी सुरळीतपणे मुद्रांकविक्री सुरू करण्यात आली आहे. यानंतरसुद्धा असा प्रकार समोर आल्यास निश्चितच कडक कारवाई करण्यात येईल.
- अजितकुमार येळे, तहसीलदार, चिखली

मुद्रांकाची जादा दराने विक्री नित्याचेच
येथील मुद्रांक विक्रेते अधिक दराने मुद्रांक विक्री नेहमीच करीत असून याविरुद्ध कुणी आवाज उठविल्यास हे मुद्रांक विक्रेते सामूहिकरीत्या मुद्रांक विक्री बंद करतात. तसेच मुद्रांक विक्रीबाबत मोठा घोळ निर्माण करून नेहमीच अरेरावी करीत असतात. 100 रुपयांचा मुद्रांक कधीकधी 150 तर 200 रुपयांनासुद्धा विक्री करण्यात येते. याबाबत संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष जाणीवपूर्वक होत असल्याचे निदर्शनास येते. तसेच बहुसंख्य नागरिक तथा शेतकरी चढ्या भावाने मुद्रांक घेत त्यांना एकप्रकारे प्रोत्साहन देत असतात हे विशेष. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com