जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या लाल पाण्यावर होणार संशोधन; पाण्याचे नमुने केले संकलित

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 11 June 2020

सुमारे 50 हजार वर्षांपूर्वी उल्का पातातून लोणार सरोवरची निर्मिती झाली असून, या सरोवरातील खाऱ्या पाण्यामुळे हे जगभरातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे.

लोणार (जि.बुलडाणा) : जगप्रसिद्ध लोणार सरोवर हे मागील काही दिवसांपासून त्यातील लाल पाण्यामुळे चर्चेत आले आहे. हे पाणी पाहण्यासाठी नागरिक सरोवर परिसरात फिरत आहेत. (ता.10) वन विभाग अकोला यांचेमार्फत लोणार सरोवरातील लाल पाण्याचे नमुने संकलित करण्यात आले. प्रयोग शाळेतील अहवालानंतर याबाबत खुलासा होणार असला तरी, अहवाल येई तोपर्यंत नागरिकांत उलट सुलट चर्चा सुरू आहे.

सुमारे 50 हजार वर्षांपूर्वी उल्का पातातून लोणार सरोवरची निर्मिती झाली असून, या सरोवरातील खाऱ्या पाण्यामुळे हे जगभरातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनले आहे. येथे दरवर्षी जगाच्या विविध कानाकोपऱ्यातून संशोधक, पर्यटक येत असतात. मात्र, गेल्या तीन महिन्यापासून कोरोना प्रादुर्भाव पाहता तसेच देशभरात सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे येथे संशोधक आणि पर्यटक आलेले नाही.

महत्त्वाची बातमी - अकोल्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या नऊशेपार

मागील आठवड्यात चक्रीवादळाच्या दरम्यान लोणार परिसरात झालेला पाऊस यामुळे सरोवरातील पाणी पातळी वाढली. टाळेबंदीमध्ये थोडी ढील दिल्यामुळे नागरिक सरोवर परिसरात फिरत आहेत. काही दिवसांपासून लोणार सरोवर मधील पाणी लाल दिसत असल्यामुळं नागरिकांत याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे. 

हेही वाचा - ऐका हो ऐका...सहकारी संस्था करणार आता कृषी निविष्ठांची विक्री

दरम्यान, ‘सकाळ’मध्ये याबाबत वृत्त येताच तहसीलदार सैफन नदाफ यांनी लोणार सरोवराच्या पाण्याची पाहणी करून वनविभागाला या पाण्याचे नमुने घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यावर तत्काळ आज वनविभागाकडून अकोला येथील डॉ. मिलिंद शीरभाते यांना या पाण्याचे नमुने घेण्यासाठी पाठविण्यात आले होते. त्यांनी नमुने हे तपासणीसाठी निरी नागपूर यांचेकडे तपासणीसाठी पोचल्यानंतर त्याबाबतचा अहवाल येणे अपेक्षित आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Research will be done on the red water of the world famous Lonar Lake