वाढदिवासाची पार्टी भोवली! जेवणातून २५० जणांना विषबाधा
मूर्तिजापूर (अकोला) : अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर (Murtijapur Akola) तालुक्यात असलेल्या घुंगशी या गावात वाढदिवसानिमित्ताने आयोजित जेवणाच्या कार्यक्रमात २५० जणांना विषबाधा झाल्याची घटना सोमवारी रात्री उशीरा उघडकीस आली. सर्वांवर पारद प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचार करण्यात येत आहे. काही जणांना अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (Akola Government Medical College) सर्वोपचार रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे.
अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील घुंगशी येथे आयोजित एका वाढदिवसाच्या निमित्ताने लोकांना जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आलाय. घुंगशी येथील गोपाळ सौंदळे यांच्या लहान मुलाच्या वाढदिवसानिमित्य सोमवारी रात्री कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात येणाऱ्या पाहुण्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. जेवणानंतर रात्री १ वाजता दरम्यान पाहुण्यांना अचानक मळमळ आणि उलट्या सुरू झाली. त्यामुळे तब्बल २५० लोकांना मूर्तिजापूर तालुक्यातील पारद प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. त्यातील काही रुग्णांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात मंगळवारी उपचारासाठी पाठविण्यात आले. जेवणातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. विषबाधा झालेल्या नागरिकांवर सध्या उपचार सुरू आहेत. सुदैवाने या घटनेत अद्याप कुठलीही जीवित हानी झाल्याची माहिती मिळाली नाही.