अकोला जिल्ह्याचा मृत्यूदर राज्यात दुसऱ्या स्थानी; मृत्यू रोखण्यात आरोग्य विभाग अपयशी

सकाळ वृत्तसेेवा
Friday, 4 December 2020

  गत महिन्यात अचानक गती मंदावलेला कोरोनाचा संसर्ग दिवाळी संपताच पुन्हा एकदा वाढत असल्याचे दिसून येत आहे.

अकोला :  गत महिन्यात अचानक गती मंदावलेला कोरोनाचा संसर्ग दिवाळी संपताच पुन्हा एकदा वाढत असल्याचे दिसून येत आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या १५ तारखेपर्यंत २० ते २५ पॉझिटिव्ह रुग्ण संख्येच्या आता असलेली कोरोनाग्रस्तांची संख्या आता डिसेंबर महिन्यात अचानक वाढत आहे. याव्यतिरीक्त मृत्यूदर सुद्धा ३.७ टक्क्यांवर पोहचला असून वाढलेल्या मृत्यूदरामुळे अकोला जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानी आहे,

तर मुंबईचा मृत्यूदर राज्यात प्रथम ३.९ टक्के आहे. अकोला जिल्ह्याचा वाढलेला मृत्यूदर धडकी भरणारा असला तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१ टक्के असल्याने थोडे दिलासादायक चित्र आहे.
कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोविड-१९ रोगाने जिल्ह्यात मार्च महिन्यापासून धुमाकूळ घातला आहे.

सुरुवातीच्या काळात महानगरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा नंतर गाव खेड्यात सुद्धा प्रादुर्भाव वाढला. सप्टेंबर महिन्यात तर कोरोनाग्रस्तांच्या संख्येने उच्चांकी गाठली होती. या महिन्यात नव्याने आढळणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या दोन हजारांवर पोहचली होती.

त्यासह ॲक्टिव्ह रुग्ण सुद्धा एक हजारांवर गेले होते. मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या सुद्धा ६० वर जावून पोहचली होती. त्यामुळे कोरोनाग्रस्तांचा जिल्ह्यात गुणाकार सुरू असल्याचे दिसून आले होते. परंतु ऑक्टोबर महिन्यात मात्र कोरोनाग्रस्तांच्या संख्या सतत कमी होत असल्याचे दिसून आले. ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण १३ ऑक्टोबररोजी आढळले.

यादिवशी ३३ रुग्णांची नोंद झाली होती. सप्टेंबरमध्ये मात्र कोरोनाग्रस्तांची संख्या प्रतिदिवशी शंभरावर जावून पोहचली होती. मृत्यूचा दर सुद्धा सप्टेंबर महिन्यासह इतर महिन्यात तुलनेत सर्वाधिक होता. दरम्यान ऑक्टोबर पासून नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत कोरोनाचा वेग मंदावला होता. परंतु आता पुन्हा कोरोनाग्रस्त आढळण्याची संख्या वाढत असून मृत्यूदर सुद्धा वाढला आहे.

रुग्ण सापडण्याची गती वाढली
नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाग्रस्त कमी आढळत होते, परंतु नंतरच्या काळात मात्र कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. २ डिसेंबर रोजी कोरोनाचे २६ नवे रुग्ण आढळले, त्यासह दोन रुग्णांचा मृत्यू झाला. १ डिसेंबररोजी २७ नवे रुग्ण आढळले. ३० नोव्हेंबररोजी २८, २९ नोव्हेंबररोजी १८ नवे रुग्ण आढळले तर २ रुगांचा मृत्यू झाला. २९ नोव्हेंबररोजी २ रुग्णांचा बळी गेला तर ३७ नवे रुग्ण आढळले. कोरोनाग्रस्तांची वाढती आकडेवारी चिंतेत भर पाडणारी आहे.

असा आहे इतर जिल्ह्यांचा मृत्यूदर
मुंबई ३.९ टक्के, परभणी ३.२ टक्के, सांगली ३.५ टक्के, कोल्हापूर व रत्नागिरी ३.४ टक्के, सोलापूर ३.३ टक्के, ओस्मानाबाद व सातारा ३.२ टक्के आणि नांदेडचा कोरोना मृत्यूदर ३ टक्के आहे.

(संपादन - विवेक मेतकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola district has the second highest mortality rate in the state; Health department fails to prevent deaths