Akola : जगाचा पोशिंदा शेतकरीच शासकीय धान्यापासून वंचित! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola

Akola : जगाचा पोशिंदा शेतकरीच शासकीय धान्यापासून वंचित!

अकोला : जिल्ह्यातील एपीएल रेशनकार्डधारक शेतकऱ्यांना शासनामार्फत रेशन दुकानातून करण्यात येत असलेल्या गव्हाचे वितरण जुलै महिन्यापासून बंद आहे. परंतु गत महिन्यापर्यंत शेतकऱ्यांना तांदुळाचे वितरण येत होते. दरम्यान आता शासनामार्फत गव्हा पाठोपाठ तांदुळाचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यापासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तांदुळापासूनही वंचित रहावे लागत आहे. परिणामी जगाच्या पोशिंद्यालाच धान्यासाठी तरसावे लागत असल्याचे दिसून येत आहे.

राज्यात दुष्काळाच्या काळात १४ दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाने अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट करत तीन रुपये किलो तांदूळ व दोन रुपये किलो गहू या सवलतीच्या दराने एका कुटुंबाला प्रतिमहिना जास्तीत जास्त २५ किलो धान्याचा लाभ देण्यास पात्र ठरविले होते.

जिल्ह्यातील ४१ हजार ७६९ शेतकरी कुटुंबांतील एक लाख ६५ हजार ५५५ शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत होता. शेतकरी आत्महत्या थांबवी यासाठी सदर योजना शासनाने सुरु केली. त्यामुळे योजनेचा शेतकऱ्यांना दिलासा सुद्धा मिळत आहे, परंतु असे असले तरी जिल्ह्यातील शेतकरी लाभार्थ्यांना जुलै महिन्यापासून गव्हाचे वाटप बंद आहे, तर तांदुळाचे वाटप मात्र करण्यात येत होते. दरम्यान सप्टेंबर महिन्यापासून तांदुळाचे वाटप सुद्धा बंद झाल्याने दोन-तीन महिन्यापासून जगाचा पोशिंदाच रेशन दुकानात गहू व तांदुळासाठी चकरा मारत आहे.

असे मिळते धान्य

लाभार्थी शेतकऱ्यांना दोन रुपये प्रति किलोने चार किलो गव्हाचे वापट करण्यात येते. सदर वाटप प्रति व्यक्तीया हिशोबाने करण्यात येते. लाभार्थ्यांना तीन रुपये प्रति किलो या प्रमाणे एक किलो तांदुळाचे वाटप करण्यात येते. सदर वाटप प्रतिव्यक्ती एक किलो या प्रमाणे करण्यात येते.

जिल्ह्यातील एपीएल शेतकरी कार्डधारकांना सवलतीच्यादरात गहू व तांदुळाचे वाटप धान्याचा पुरवठा होत नसल्याने बंद आहे. धान्य पुरवठ्यासाठी शासनकडे धान्याची मागणी करण्यात आली आहे. सदर धान्याचे वाटप रखडले असले तरी शेतकऱ्यांना आनंदाचा शिधाचे मात्र वाटप करण्यात आले.

- बी.यू. काळेजिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला

टॅग्स :AkolaFarmerRation Card