किती वाजवणार हॉर्न, कानाचा पडदा फुटंल की!

सकाळ वृत्तसेेवा
Saturday, 16 January 2021

शहरात दुचाकी वाहन धारकांची संख्या कमालीची वाढली असून,दुचाकी वाहनामध्ये मॉडिफिकेशन करून, जास्त ‌आवाजाचे सायलेन्सर आणि हॉर्न बसविण्याचे तसेच कर्णकर्कश आवाजाची साऊंड सिस्टीम बसवून अकोट शहरात सुसाट वेगात फेरफटका मारण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे.

अकोट  (जि.अकोला) : शहरात दुचाकी वाहन धारकांची संख्या कमालीची वाढली असून,दुचाकी वाहनामध्ये मॉडिफिकेशन करून, जास्त ‌आवाजाचे सायलेन्सर आणि हॉर्न बसविण्याचे तसेच कर्णकर्कश आवाजाची साऊंड सिस्टीम बसवून अकोट शहरात सुसाट वेगात फेरफटका मारण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे.

चक्क उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय अकोट व शहर तसेच ग्रामीण पोलिस ठाण्याच्या बाहेरील रस्त्यावरच या गाड्या फेरफटका मारत, शिवाजी चौक परिसरात जात असतात परंतु अशा वाहनांवर स्थानिक पोलिस व वाहतूक पोलिस कारवाई करत नसल्याने अकोट वासीयांच्या मनात कमालीचा नाराजीचा सूर उमटत आहे.

हेही वाचा - खासदारांच्या गावात स्वाभिमानीच्या शिट्ट्यांनी बसल्या शिवसेनेच्या कानठळ्या

बेकायदा वाहनांवर कारवाई करण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांची आहे, मात्र, चक्क ठाण्याच्या बाहेरील रोडवरील ‘मोटारवाहन कायद्या’चे उल्लंघन करणाऱ्यांवर गाड्यावर कारवाई करण्यात शहर ‘वाहतूक पोलिस’ हतबल ठरल्याचे चित्र आहे.

शहरात गेल्या काही वर्षांपासून ‘बुलेट राजां’चे प्रस्थ वाढले आहे. बुलेटच्या सायलेन्सरमध्ये फेरफार करून किंवा वेगळ्या प्रकारचे सायलेन्सर बसवून त्यातून फटफट आवाज ऐकून कानठळ्या बसतील असा आवाज काढण्याचे प्रकार तरुणांमध्ये भलतेच लोकप्रिय झाले आहेत.

हेही वाचा - शेतकऱ्यांना मिळणार अतिवृष्टीचे 25 कोटी रुपये! निधी तहसीलदारांच्या खात्यात जमा

या आवाजामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालक, पादचारी जेरीस आले आहेत. त्यामुळे नियमबाह्य पद्धताने वर्तणूक करणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी सातत्याने होत आहे. ही कारवाई प्रामुख्याने वाहतूक पोलिसांकडून केली जाते परंतु शहरातील वाहतूक विभाग शिवाजी चौक, बस स्थानक परिसर, कलदार चौक, अकोला नाका या परिसरात नको त्या कारवाई करण्यात रमलेला असल्याने बेशिस्त वाहनचालकांचे चांगलेच फावत आहे.

हेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

शहरात अकोला नाका,दर्यापूर रोड,यात्रा चौक, सिंधी कॅम्प, शिवाजी कॉलेज रोड, पोपटखेड रोड,बस स्थानक परिसर,रेल्वे स्टेशन परिसर या ठिकाणी सकाळी व सायंकाळी शहरातील अनेक वृद्ध नागरिक फिरण्यासाठी येत असतात. खासकरून सायंकाळी रोडरोमिओं वाहनचालक मॉडिफिकेशन केलेल्या चारचाकी वाहनात कर्कश आवाजाची साऊंड सिस्टीमचा आवाज वाढवत सायलेन्सरने आवाज काढत फेरफटका मारतात. यातच भर म्हणून दुचाकीवरून कानठळ्या बसतील असे फटफट आवाज काढणारे सायलेन्सर आणि हॉर्न वाजवत तरुण मंडळी भर टाकतात या आवाजाच्या त्रासाने नागरिक पुरते हैराण झाले असून पोलिस विभाग कोणतीही कारवाई करत नसल्याने या प्रकाराला आळा बसण्याऐवजी आणखी वाढत असल्याचे चित्र आहे.

हेही वाचा - महानगरपालिकेच्या दिव्याखालीच अंधार,अग्निशमन दलाचा कारभार अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या भरवशावर, प्रभारी अधिकारी हाकतायेत गाडा

थोडक्यात बचावले
शहरात अपघाताची मालिका सतत सुरू असून शहरातून जाणाऱ्या अकोला रोड, हिवरखेड रोडची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. नववर्षाच्या सुरवातीलाच अकोला रोड वरील पेट्रोल पंप नजीक चारचाकी वाहनाचा अपघात झाला. यामध्ये काही जणांना गंभीर दुखापत झाली. अशातच शहरातील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी शिवाजी चौक परिसराच्या मागच्या भागात असणाऱ्या सिंधी कॅम्प येथे राजदे प्लॉट भागातील रहिवासी निरंजन पचांग आपल्या दुचाकीने घरी येत असताना, समोरून सुसाट वेगाने येणाऱ्या एका विनाक्रमांकाच्या वाहकाने गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी जाब विचारला गेले असता सदर व्यक्ती आपल्या विनाक्रमांकाच्या वाहनाने त्याठिकानाहून सुसाट वेगाने निघून गेला.

अकोट शहरात अनेक वाहने विनाक्रमांकाची असून, शिवाजी चौकातील वाहतूक पोलिसांना चकमा देण्यासाठी गल्ली बोळातून सुसाट धावत असतात, अशा वेळी विनाक्रमांकाच्या वाहनाने जर अपघात झाला तर दोष कुणाला द्यायचा असा प्रश्न विचारला जात आहेत. त्यामुळे अकोला शहरात बुलेट राजा, आणि विना क्रमांक रस्त्यावर वेगाने गाडी चालविणाऱ्या वाहनधारकांवर जशी कारवाई केली जात आहे. तशीच कारवाई वाहतूक शाखेने आता अकोट शहरातही राबविण्याची मागणी आता अकोटवासी करत आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Marathi News-Modified Bullet Sound Headache, Bullet Sound Harasses Citizens in Akot