esakal | दीडशे वर्षे जुन्या चिंचेच्या झाडाची फांदी तुटली अन् चिमुकल्या भावेशचा जागीच मृत्यू झाला
sakal

बोलून बातमी शोधा

Akola News: A 150-year-old tamarind tree branch breaks and Bhavesh dies on the spot

जळगाव जामाद ते वरवट बकाल रस्त्यावरील चिंचेच्या झाडाची महाकाय फांदी अंगावर पडल्याने नऊ वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला. याच घटनेत मोटारसायकलवरील दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना चांगेफळ बस स्टँडजवळ ता. २९ सप्टेंबर रोजी दुपारी घडली.

दीडशे वर्षे जुन्या चिंचेच्या झाडाची फांदी तुटली अन् चिमुकल्या भावेशचा जागीच मृत्यू झाला

sakal_logo
By
पंजाबराव ठाकरे

संग्रामपूर (जि.बुलडाणा) :  जळगाव जामाद ते वरवट बकाल रस्त्यावरील चिंचेच्या झाडाची महाकाय फांदी अंगावर पडल्याने नऊ वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला. याच घटनेत मोटारसायकलवरील दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना चांगेफळ बस स्टँडजवळ ता. २९ सप्टेंबर रोजी दुपारी घडली.


राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या हद्दीत जळगाव जामोद ते वरवट बकाल मार्गावर दीडशे वर्षांपूर्वीचे चिंचेची महाकाय झाडे रस्त्याच्या दुतर्फा आहेत. यापैकी गावाच्या बाजूने असलेल्या वेल्डींग दुकान जवळील झाडाची जीर्ण झालेली मोठी फांदी मंगळवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास रस्त्यावर कोसळली. त्यावेळी झाडाच्या सावलीत गावातील ६ ते ७ मुलं खेळत होती. रस्त्याने वाहनांची वर्दळ ही सुरू होती.

झाडाची फांदी कोसळत असताना काही नागरिकांनी आरडा ओरड केली. त्यामध्ये काही मुले गावाच्या दिशेने पळाली तर भावेश सुभाष साबे झाडाच्या दिशेने रस्त्याकडे पळत असताना त्याचे अंगावर भली मोठी फांदी येऊन पडली.

त्या फांदी खाली भावेश आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच वेळात एम एच २८-५२४२ क्रमांकाची मोटारसायकल रस्त्याने जात होती. त्या बाईकवर दशरथ खंडेराव, आनंद वानखडे स्वार होते. मात्र, ते दोघेही थोडक्यात  वाचले.

गावातील लोकांनी मोटरसायकल आणि दोघांना तातडीने बाहेर काढून उपचारासाठी रवाना केले. या घटनेमुळे वाहतूक ठप्प झाली होती. तामगाव पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन झाडाची कापणी सुरू केली.


जीर्ण झाडांचा बंदोबस्त करा!
हा रस्ता अगोदर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत होता. या ठिकाणी जवळपास दोनशे वर्षांची चिंचेची पाच ते सहा महाकाय झाडे रस्त्याच्या दोन्ही बाजूने जीर्ण अवस्थेत उभी आहेत. या झाडाचा विस्तार ही खूपच झालेला आहे. पावसाळ्यात मोठ्या फांद्यांमध्ये पावसाचे पाणी मुरते. त्यापैकीच एक फांदी पडून मंगळवारी ही दुर्दैवी घटना घडली. हा रस्ता आता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तातरीत झाला असल्याने ही झाडे तोडण्याची जबाबदारी कुणाची हा प्रश्न निर्माण होत आहे. भविष्यात अश्या दुर्घटना घडू नयेत याची दक्षता घ्यावी, अशी मागणी ही जोर धरीत आहे.

(संपादन - विवेक मेतकर)