80 टक्के कपाशी बोंड अळीने केले नष्ट

सकाळ वृत्तसेेवा
Monday, 30 November 2020

बोंड अळीमुळे अकोला जिल्ह्यातील ८० टक्के कपाशी नष्ट झाली असल्याचा अहवाल कृषी विभागाने राज्य शासनाकडे सादर केल्याची माहिती आहे. त्यामुळे आता राज्य शासन शेतकऱ्यांना या संकटात कोणती मदत करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

अकोला  ः बोंड अळीमुळे अकोला जिल्ह्यातील ८० टक्के कपाशी नष्ट झाली असल्याचा अहवाल कृषी विभागाने राज्य शासनाकडे सादर केल्याची माहिती आहे. त्यामुळे आता राज्य शासन शेतकऱ्यांना या संकटात कोणती मदत करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अतिवृष्टी व असंतुलित वातावरणामुळे खरीप पिकांवर अज्ञातरोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पिके शेतकऱ्यांच्या हातातून गेली. कापसासारखे एकमेव नगदी पीक बोंड अळी व बोंडसळमुळे नष्ट होत आहे. पश्चिम विदर्भात कपाशी हे एकमेव नगदी पीक आहे. यावर्षी बोंड अळी व बोंड सळ यामुळे कपाशी पीक सुद्धा नष्ट झाले आहे.

अकोला जिल्ह्यात कृषी विभागाकडून ८० टक्के क्षेत्रावरील कपाशी पीक धोक्यात आल्याचा प्राथमिक अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे. त्यामुळे कपाशी उत्पादक शेतकरी प्रचंड प्रमाणावर आर्थिक संकटात सापडला आहे.

कपाशीच्या पेरणीपासून प्रत्यक्ष उत्पादन घेई पर्यंत जो मोठ्या प्रमाणात खर्च येतो तो सर्वश्रुत आहे. यावर्षी बोंड अळीच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांना कापूस वेचणीचा प्रारंभ सुद्धा करता आला नाही इतकी भयावह परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे.

धान उत्पादकांप्रमाणे करा मदत
महाराष्ट्रातील २६ जिल्ह्यात सुमारे ७० लाख कापूस उत्पादक शेतकरी संकटात आहेत. ज्या प्रमाणे राज्य शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत केली आहे, त्याच प्रमाणे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनाही मदत करण्याची मागणी जोर धरत आहे.

केंद्र सरकारने निश्चित केलेल्या किमतीच्या दरा व्यतिरिक्त किमान २ हजार रुपये प्रती क्विंटल बोनस स्वरुपात प्रोत्साहन मदत रक्कम म्हणून देण्याची मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार व पणन मंत्री, कृषी मंत्री तसेच विधानसभा व विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते यांचेकडे केली आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: 80 per cent cotton bond destroyed by larvae