झाडाझडती सुरू, महानगरपालिकेत सलग तिसऱ्या दिवशी कर्मचाऱ्यांवर कारवाई

मनोज भिवगडे
Saturday, 17 October 2020

महानगरपालिकेच्या ढेपाळलेला कारभार टाळ्यावर आणण्यासाठी आयुक्त संजय कपाडणीस यांनी कारवाईचा धडाका लावला आहे. सलग तिसऱ्या दिवशी आयुक्तांनी कारवाई करीत ६६ लेटलतिफ कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा आदेश दिला.

अकोला  : महानगरपालिकेच्या ढेपाळलेला कारभार टाळ्यावर आणण्यासाठी आयुक्त संजय कपाडणीस यांनी कारवाईचा धडाका लावला आहे. सलग तिसऱ्या दिवशी आयुक्तांनी कारवाई करीत ६६ लेटलतिफ कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा आदेश दिला.

मनपा आयुक्तांनी बुधवारपासून विविध विभागांची झाडाझडती सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी त्यांनी कारवाईचा बडगा उगारत १४७ कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात केले होते. दुसऱ्या दिवशी ८१ लेटलतिफ कर्मचारी आढळले.

दोन दिवसांच्या कारवाईनंतरही मनपा कर्मचारी सुधारण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी आयुक्त कापडणीस यांनी विविध विभागांची झाडझडती घेतली असता तब्बल ६६ लेटलतिफ कर्मचारी आढळून आले. त्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा आदेश सायंकाळी आयुक्तांनी दिला. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

उपस्थिती रजिस्टरांची तपासणी
मनपा आयुक्‍त संजय कापडणीस यांच्‍या आदेशान्‍वये मनपा कार्यालयांचे हजेरी रजिस्‍टरांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. या तपासणीमध्ये शुक्रवारी एकूण ६६ कर्मचारी कोणतेही पूर्व सूनचा न देता गैरहजर असलेले आढळून आले. ही बाब कार्यालयीन कामकाजाच्‍या दृष्‍टीने शिस्‍तीस अनुसरून नसून कर्तव्‍यात कसूर करणारी असल्याने त्यांच्या वेतन कपातीचा आदेश देण्यात आला.

शुक्रवारच्या कारवाईतील विभागनिहाय्य कर्मचारी
सामान्‍य प्रशासन विभाग १, माहिती अधिकार कक्ष १, जलप्रदाय विभाग २, विद्युत विभाग १४, आरोग्‍य (स्‍वच्‍छता) विभाग २, नगरसचिव विभाग २, पूर्व झोन कार्यालय ८, पश्चिम झोन कार्यालय १०, उत्‍तर झोन कार्यालय १९, दक्षिण झोन कार्यालय ७

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Action against employees in the corporation for the third day in a row