विनामास्क सवारी घेणाऱ्या दोनशे ऑटो चालकांवर कारवाई!

सुगत खाडे  
Tuesday, 29 September 2020

मास्क न घालता सवारी घेऊन जाणाऱ्या २०० ऑटो चालकांविरुद्ध शहर वाहतूक शाखेने दंडात्मक कारवाई केली. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात अकोला शहरात सुरू असलेल्या ‘नो मास्क नो सवारी’ या मोहिमेची राज्याचेय गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेत ‘ट्विट’करून त्यांनी मोहिमेचे कौतुक केले आहे.

अकोला :  मास्क न घालता सवारी घेऊन जाणाऱ्या २०० ऑटो चालकांविरुद्ध शहर वाहतूक शाखेने दंडात्मक कारवाई केली. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनात अकोला शहरात सुरू असलेल्या ‘नो मास्क नो सवारी’ या मोहिमेची राज्याचेय गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेत ‘ट्विट’करून त्यांनी मोहिमेचे कौतुक केले आहे.

अकोला पोलिस अधीक्षक जी. श्रीधर ह्यांचे मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक पोलिस निरीक्षक गजानन शेळके यांनी अकोला शहरात कोरोना संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजनांचा एक भाग म्हणून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत ‘नो मास्क नो सवारी’ उपक्रम सुरू केला.

दोन दिवस ऑटो चालकांमध्ये याबाबत प्रचार केला. त्यांना मोहिमेची रुपरेखा, त्यांच्या व त्यांच्या कुटुंबियाच्या सुरक्षेसाठी त्याची उपयुक्तता लक्षात आणून दिली. स्वतः मास्क घावणे व ऑटोतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनासुद्धा मास्क घालण्याचा आग्रह धरला. त्यानंतर दोन दिवस शहरात धावणाऱ्या ऑटोवर ‘नो मास्क नो सवारी’, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या उपक्रमांची माहिती देणारे पोस्टर्स लावले. त्यानंतरही या मोहिमेला प्रतिसाद न देणाऱ्या ऑटो चालकांना वठणीवर आणण्यासाठी सोमवारी स्वतः पोलिस निरीक्षक गजानन शेळके आणि त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी मास्क न घालता सवारी घेणारे व मास्क नसलेल्या प्रवाशांना ऑटोत प्रवास करण्याची परवानगी देणाऱ्या ऑटो चालकांवर कारवाई केली.

या भागात कारवाई
शहर वाहतूक शाखेतर्फे एकाच वेळी गांधी चौक, कोतवाली चौक, टॉवर चौक, धिंग्रा चौकांमध्ये कारवाई सुरू करण्यात आली. कारवाई सुरू झाल्यानंतर ऑटो चालक मास्क घालून ऑटोत बसलेल्या प्रवाश्यांना सुद्धा मास्क घालण्याचा आग्रह करताना दिसून आले. त्यानंतरही दिवसभरात तब्बल २०० ऑटो चालकांना मास्क न घालणे व मास्क नसलेल्या प्रवाशांना ऑटोत बसण्याची परवानी दिल्याबद्दल दंडात्मक कारवाई करण्यात आली.

दररोज होईल कारवाई
ऑटो चालकांकडून मास्कच्या नियमांचे काटेकोर पालन करून घेण्यासाठी वाहतूक पोलिस दररोज कारवाई करणार आहे. त्यामुळे ऑटो चालकांनी स्वःताहून ‘नो मास्क, नो सवारी’ मोहिमेत सामील होऊन कोरोनापासून स्वःताचा बचाव करावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक गजानन शेळके यांनी केले आहे.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola News: Action taken against 200 auto drivers practicing without mask!