शेतीला उद्योगाचा दर्जा आवश्यक- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Akola News: Agriculture needs industry status- Chief Minister Uddhav Thackeray
Akola News: Agriculture needs industry status- Chief Minister Uddhav Thackeray

अकोला : चारही कृषी विद्यापीठातून हजारो विद्यार्थी कृषी शिक्षण घेऊन बाहेर पडतात. ते पुढे काय करतात, कोणत्या क्षेत्रात काम करतात, कृषी क्षेत्रातच कार्यरत आहेत की अन्य क्षेत्रात? याचा आढावा कृषी विद्यापीठांनी घ्यावा. यातून आपण विद्यार्थ्यांना खरच उपयुक्त शिक्षण देतो का, हे समजून येईल. काही सुधारणा करावयाच्या असतील तर त्याही स्पष्ट होतील.

संशोधकांची बुद्धी, माहिती आणि जैव तंत्रज्ञान, बाजारपेठ संशोधन यामधून शेतकऱ्यांसाठी एक परिपूर्ण संशोधन असलेले ‘प्रॉडक्ट’ या पाच दिवसांच्या संशोधन समितीच्या बैठकीत निश्चित केले जावे. शेतीला उद्योगाचा दर्जा देत नाही तोपर्यंत आपले सगळे प्रयत्न पूर्णत्वाला जाणार नाहीत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगत चारही कृषी विद्यापीठांना एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला.

संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समिती सभेचे ऑनलाइन उद्‍घाटन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते. कृषीक्षेत्रातील संशोधनात्मक कामांना प्रेरणा देऊन माहिती घेण्यासाठी, त्यांना आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची उपलब्धता करून देण्यासाठी आपण दर महिन्याला भेटू. कृषी क्षेत्रातील संशोधन आणि प्रगतीवर चर्चा करू, असे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी विस्कळीत शेती आणि शेतकऱ्यांना संघटित करून काम करण्याची, शेतकरी, शेतमजूरांच्या आरोग्यासाठी योजना आखण्याची, गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितली.

आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठास दिलेल्या भेटीच्या आठवणीचा उल्लेख केला. येथील संशोधन असलेल्या खाकी रंगाच्या कापसाच्या वाणाबद्दलही त्यांनी आवर्जून उल्लेख केला. अन्य रंगांमधील कापसाचे वाण विकसित करता येतात का? याबद्दल विद्यापीठाने संशोधन करावे, असेही त्यांनी सांगितले.


या राज्यस्तरीय बैठकीचे स्वागताध्यक्ष डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम भाले यांनी प्रारंभी दीपप्रज्वलन करून डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बैठकीचे प्रयोजन व रुपरेषा स्पष्ट केली. बैठकीच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणेचे संचालक संशोधन डॉ. हरिहर कौसडीकर, संचालक संशोधन डॉ. व्ही. के. खर्चे यांचेसह सर्व संचालक, कुलसचिव आणि बैठकीचे यशस्वितेसाठी गठित विविध समिती अध्यक्ष, सहअध्यक्ष, सचिव तथा सदस्य तसेच कृषी, फलोत्पादन, मृद व जलसंधारण, वन विभाग, महाबीज असे शेतीशी संबंधित विभागांचे अधिकारी ऑनलाईन सहभागीझाले होते.

या ऑनलाईन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी केले व संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी आभार मानले.


संशोधनाची दिशा स्पष्ट करणारे सशक्त व्यासपीठ- दादाजी भुसे
राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी, बदलत्या हवामानामुळे शेतपिकांवर होणारे परिणाम ही कृषी संशोधकांसमोरील आव्हानात्मक बाब असल्याचे सांगून, या पार्श्वभूमीवर विचार विनिमय घडवून आणून संशोधनाची दिशा काय असावी हे स्पष्ट करणारे हे सशक्त व्यासपीठ असल्याचे सांगितले. कापूस आणि सोयाबीन या दोन महत्त्वाच्या पिकांसाठी गुणवत्ता आणि संख्यात्मकदृष्ट्या अधिक सखोल संशोधन होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

कृषी संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याची गरज व्यक्त करतांना, कृषी विद्यापीठांकडील मोकळ्या जमिनीवर रोपवाटिका, बियाणाच्या निर्मितीसाठी प्रयत्न केला जावा, असेही ना. भुसे यांनी सांगितले. ते म्हणाले की, राज्यात अनेक शेतकरी प्रयोगशील आहेत, ते आपापल्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करत असतात. शेतकऱ्यांची ही जी ‘रिसोर्स बँक’ आहे, त्याची माहिती घेऊन शेतीक्षेत्रातील संशोधनाला अधिक बळ देण्याचे आवाहन ही त्यांनी केले.


आतापर्यंतच्या संशोधनाचा आढाव घ्या!
आतापर्यंत झालेल्या कृषी संशोधनाचे नेमके काय झाले, शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत किती संशोधन गेले याचा आढावा कृषी विद्यापीठांनी कधी घेतला नाही. त्यामुळे संशोधनाचा फायदा नेमका शेतकऱ्यांना किती झाला हे जाणून घेण्यासाठी आतापर्यंत झालेल्या संशोधनाचा आढावा घेण्याची गरज असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.

कृषी क्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा- केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे
कृषी क्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा, असे आवाहन केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केले. ते म्हणाले की, यासाठी कृषी क्षेत्रातील डेटा संकलन परिपूर्ण, अचूक आणि अधिकृत होण्याची गरज आहे. आपल्या विद्यापीठांनी अनेक क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करून दाखवली आहे. कोरोना काळात पीपीई कीट, मास्क, व्हेंटिलेटर्स सारखे संशोधन आपल्याकडे मोठ्याप्रमाणात झाल्याचेही ते म्हणाले. शिवार फेऱ्या काढून शालेय विद्यार्थ्यांच्या कृषी महाविद्यालये, कृषी विद्यापीठांमध्ये भेटी आयोजित कराव्यात. जेणेकरून विद्यार्थ्यामध्ये शेतीची आवड निर्माण होऊन शेतीच्या प्रगतीची बिजे त्यांच्या मनात रुजण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.


चार कृषी विद्यापीठातील २०८ शिफारसीचे सादरिकरण
पाच दिवस चालणाऱ्या या ऑनलाईन बैठकीत राज्यांतर्गत तथा देशपातळीवर विविध पिक वाणे, यंत्रे-अवजारे तथा संशोधनात्मक शिफारसी व तंत्रज्ञान सादरीकरण चर्चा व सुधारणांसह प्रसारित करण्यात येणार आहेत. यावर्षी चारही कृषी विद्यापीठांमधून एकूण २०८ शिफारसी या बैठकीमध्ये सादर होणार आहेत. यामध्ये १६ पीक वाण, १२ यंत्रे व अवजारे तर १८० पिक उत्पादन तंत्रज्ञान यांचा समावेश आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com